मुंबई-गोवा महामार्गांवर तुरळ येथे ट्रॅव्हल्स-डंपरचा अपघात, २१ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:25 IST2025-05-27T18:24:32+5:302025-05-27T18:25:13+5:30

१२ किलोमीटरपर्यंत महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा

21 injured in travel-dumper accident at Tural on Mumbai Goa highway | मुंबई-गोवा महामार्गांवर तुरळ येथे ट्रॅव्हल्स-डंपरचा अपघात, २१ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गांवर तुरळ येथे ट्रॅव्हल्स-डंपरचा अपघात, २१ जण जखमी

आरवली : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ फाटा येथे रविवारी संध्याकाळी पाच वाजता ट्रॅव्हल्स बस आणि डंपरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २१ प्रवासी किरकोळ जखमी असून, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

कडवई येथे रस्त्याचे काम करणाऱ्या ए. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीचा डंपर चालक चालू गाडी सोडून पळून गेला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक रखडली. दोन्ही बाजूला अकरा ते बारा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर रात्री नऊ वाजता ग्रामस्थ, रिक्षा व्यावसायिकांच्या मदतीने पोलिसांनी ट्रॅफिक सुरळीत केली.

कोपरखैरणे येथून गणपतीपुळे येथे आलेले भक्तगण खासगी आरामबसने (एमएच ४३ सीई ४२९३) परतीच्या मार्गावर होते. तुरळ फाटा येथे त्या बसच्या पुढे असलेल्या डंपरचालकाने (एमएच १२ डब्ल्यू जे ४७५१) उजव्या बाजूला वळताना इंडिकेटर दाखवला नाही. अचानक गाडी उजव्या बाजूला वळवल्याने आरामबस डंपरच्या मागे जाऊन जोरात धडकली. बसच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसचालकासह २१ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

महामार्गावरून कडवई येथे जाण्यासाठी असलेल्या डायव्हर्शननजीक हा अपघात झाला. त्यामुळे दोन्ही बाजूला सुमारे दहा ते बारा किलामीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. खराब डायव्हर्शनमुळे हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष थेराडे यांनी याची माहिती महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी किंवा ठेकेदार घटनास्थळी हजर न राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अखेर ग्रामस्थ आणि रिक्षा संघटनेच्या मदतीने सहायक पोलिस निरीक्षक शंकर नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली चार तासांच्या अथक प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी जितेंद्र चव्हाण, विजय कुवळेकर, राजेंद्र सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र हरेकर, अरविंद जाधव उपस्थित होते. रात्री २ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

Web Title: 21 injured in travel-dumper accident at Tural on Mumbai Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.