आठवड्याचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2020, 'या' राशींच्या व्यक्तींना भाग्योदयाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 02:35 PM2020-09-28T14:35:10+5:302020-09-28T14:37:46+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscope 27 september to 3 october 2020 | आठवड्याचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2020, 'या' राशींच्या व्यक्तींना भाग्योदयाचा योग

आठवड्याचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2020, 'या' राशींच्या व्यक्तींना भाग्योदयाचा योग

Next

मेष 

 

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या जीवनात होणारे बदल आपल्यासाठी खूपच महत्वाचे ठरतील. आपण आपल्या बौद्धिक चातुर्याने प्रत्येक काम पूर्ण करून प्रगती व वृद्धीच्या दिशेने वाटचाल कराल. समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता असून जीवनात पुन्हा सुखशांती नांदेल. आठवड्याच्या मध्या नंतर व्यावसायिक जीवनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल तशीच त्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. कारकिर्दीत काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपणास अधिक कष्ट करावे लागतील. आठवड्याच्या अखेरीस सत्ता परिवर्तनाची शक्यता आहे. आपण स्वतःच्या विकास व इच्छापूर्तीसाठी खर्च कराल. आठवड्याच्या सुरवातीस व अखेरीस विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम झाला तरी मधल्या दिवसात त्यांची अभ्यासाची गती मंदावू शकते. संबंधांच्या बाबतीत हा आठवडा आशास्पद आहे. आठवड्याच्या मध्यास कदाचित आपणास एकांतात राहण्याची किंवा संबंधांपासून विन्मुख होण्याची इच्छा होईल. आठवड्याच्या मध्यास आरोग्याची काळजी घेण्याचा विशेष सल्ला देण्यात येत आहे. आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहून गोड व चटपटीत पदार्थ खाण्याचे टाळाल. ह्या आठवड्यात पोटाचे विकार होण्याची शक्यता असल्याने आहाराकडे लक्ष द्यावे.

वृषभ 

आठवड्यात कौटुंबिक संबंधातील जवळीक वाढेल. आपण कुटुंबियांच्या खुशीसाठी भरपूर खर्च कराल. आपण आपला सभोवतालचा परिसर, घर किंवा कार्यालय येथील सुशोभीकरणासाठी खर्च करू शकाल. नशिबाची अपेक्षित साथ मिळाली नाही तरी आपण कामास अधिक महत्व द्याल व त्याच्या फलस्वरूप आपणास यथायोग्य फायदा होईल. आठवड्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपले लक्ष व्यावसायिक बाबींवर अधिक केंद्रित होईल. ह्या आठवड्यात भागीदारी कार्यात थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे. मित्र व भावंडांसाठी खर्च संभवतात. सामान्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असला तरी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत प्रयत्नशील राहून व कष्ट करून सुद्धा अपेक्षित यश मिळण्यात अडथळे येतील. उत्तरार्धात अभ्यासा पासून आपले मन विन्मुख होण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवनात आपल्या जोडीदारावर अधिक लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराच्या अपेक्षा उंचावतील. आपल्या संबंधात अहंकार आडवा येणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. पोटाचे विकार, आतड्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. ह्या व्यतिरिक्त पाठदुखी व खांदेदुखीचा त्रास संभवतो. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी उपचार करण्याच्या तंत्राचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

मिथुन 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण दुराग्रही व चिडचिडे व्हाल व त्यामुळे व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जीवनातील सौहार्दता भंग पावेल. आपणास चिंतामुक्त वृत्ती व बेफिकिरी ह्यातील फरक ओळखावा लागेल. आपण जर कोणाशी संबंधात नसाल तर आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीप्रती विशेष आकर्षित होऊन त्या व्यक्तीशी संबंध जुळविण्याची आपली प्रबळ इच्छा होईल. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी भिन्नलिंगी व्यक्तीसह एखाद्या लहानशा प्रवासाचे आयोजन करणे शक्य होईल. आठवड्याच्या मध्यास आपण व्यावसायिक आघाडीवर योग्य नियोजनासह वाटचाल करून दैनंदिन कार्यात उत्तम प्रगती करू शकाल. कामात आधिपत्य व प्रतिष्ठेत वृद्धी संभवते. आठवड्याच्या सुरवातीस खर्चात वाढ होईल, मात्र उत्तरार्धात प्राप्ती होण्याच्या शक्यतेमुळे अखेर हाती पैसा शिल्लक राहील. ह्या आठवड्यात कुटुंबियांशी चर्चा करताना वाणी संयमित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नसले तरी उत्तरार्धात त्यात सुधारणा होऊन त्यांचा अभ्यास चांगला होऊ शकेल.

कर्क

आठवड्याच्या सुरुवातीस आपण शांत व सौहार्दपूर्ण वातावरणात राहण्यास प्राधान्य द्याल. ह्या दरम्यान संबंधात पुढे जाण्यासाठी हळूहळू व धीराने पाऊल उचलावे लागेल. ह्या व्यतिरिक्त आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपल्या आरोग्यात चढ - उतार आले तरी कोणत्याही गंभीर आजाराची शक्यता दिसत नाही. एखाद वेळेस आपल्या अपेक्षेहून सुद्धा उत्तम आरोग्य असू शकेल. उत्तरार्धातील ग्रहस्थिती आपल्याला प्रवास व नवीन धाडस करण्यास प्रवृत्त करेल. पूर्वीच्या तुलनेत नशिबाची सुद्धा साथ मिळाल्याने कामात प्रगती करू शकाल. भागीदारी कार्यात सध्या थोडा विलंब होण्याची शक्यता असल्याने एखाद्या ठिकाणी आपल्या कामाचा खोळंबा झाल्यास चिडचिड करू नये. पूर्वार्धात विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नसले तरी उत्तरार्धात ते चांगला अभ्यास करू शकतील. आपणास सतत एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

सिंह 

आठवड्याच्या सुरुवातीस कामाच्या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची किंवा कामाच्या अतिरिक्त भारामुळे आपणास ज्यादा काम करावे लागण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आपण संबंधांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. हे दिवस भिन्नलिंगी संबंधांसाठी अनुकूल आहेत. आपण प्रियव्यक्तीच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात अधिक वेळ घालवून त्यांचे मन जिंकू शकाल. नवीन प्रणयी संबंध जुळवताना काळजी घ्यावी, अन्यथा आपले संबंध चुकीच्या मार्गावर जाऊ लागतील. पूर्वी एखादी समस्या आली असता आपण जर त्याकडे दुर्लक्ष केले असेल तर आठवड्याच्या उत्तरार्धात ती पुन्हा उदभवण्याची शक्यता असून त्याकडे अधिक लक्ष देऊन सावध राहावे लागेल. अखेरच्या दिवशी ग्रहांच्या प्राबल्यामुळे आपणास व्यावसायिक आघाडीवर चांगल्या संधी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी कमी होणार असल्याने ज्या विद्यार्थ्यांचे महत्वाचे वर्ष असेल त्यांना नियोजनपूर्वक वाटचाल करावी लागेल. ह्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा ऋतुजन्य विकार होण्याची शक्यता बळावेल.

कन्या 

आठवड्याच्या सुरुवातीस प्रियव्यक्तीचा सहवास, संपर्क व सभोवतालचे आनंदी वातावरण आपल्या मनास प्रसन्न ठेवेल. प्रियव्यक्तीचा सहवास रोमँटिक असेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदार व कुटुंबियांशी सौहार्दता राहील. मात्र, आपणास शाश्वत प्रेमाला महत्व देण्यास शिकावे लागेल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात लोकांकडून प्रशंसित व्हाल. ह्या आठवड्यात कुटुंबियांच्या सुखद व आरामदायी जीवनशैलीसाठी आपण गृह सजावटीत बदल करण्याची किंवा नवीन वस्तूंची खरेदी करण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरवात करताना इतरांवर अवलंबून राहण्या ऐवजी स्वतःच प्रयत्नशील राहावे. शक्य असल्यास एखादा छोटासा प्रवास रद्द करावा. मात्र, लांब पल्ल्याच्या प्रवासाची किंवा विदेशगमनाची शक्यता आहे. प्रकृतीवर ताण पडेल इतके अतिरिक्त काम करू नका. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मनाच्या उदासीनतेमुळे नकारामक विचार मनात येणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. आरोग्यात सतत चढ - उतार संभवतात.

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस कुटुंबियांसह एखाद्या सामाजिक सोहळ्यात किंवा रमणीय स्थळी फिरावयास किंवा छोटेखानी प्रवासास जाऊन आनंदात वेळ घालवू शकाल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात आर्थिक लाभ होऊन नवीन कार्याचा शुभारंभ सुद्धा करता येईल. आपण कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त असाल. आठवड्याच्या मध्यास शारीरिकदृष्ट्या सुद्धा सज्ज असाल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान असल्याचे जाणवेल. आपल्या वाक्चातुर्याने कोणालाही प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी सुद्धा आठवड्याचा पूर्वार्ध अनुकूल आहे. ज्या व्यक्ती शेअर्स बाजार, वायदा बाजार किंवा सट्टा सदृश्य प्रवृतींशी संबंधित आहेत त्या पूर्वार्धात अधिक सक्रिय होतील. आपणास त्यात फायदा होईल, परंतु अति साहस किंवा मोह आपल्या मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरेल हे ध्यानात ठेवावे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. उत्तरार्धात नोकरी करणाऱ्या किंवा फुटकळ काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या प्राप्तीत वाढ करू शकतील. सध्या आपल्या कामात सर्जनात्मकता व नवीन विचारसरणी असल्याचे दिसून येईल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरुवातीस एखाद्या महत्वाच्या निर्णयामुळे मनात गैरसमज निर्माण होईल. त्यामुळे निद्रानाश होऊन अस्वस्थता जाणवेल. आपणास वैवाहिक जोडीदार व संततीच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यास सुचविण्यात येत आहे. प्राप्तीपेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. आपण अति भावनाशील झाल्याने आपले आप्त आपल्या विरुद्ध कट रचत असल्याचे वाटू लागेल. आठवड्याच्या मध्यास स्त्रियांप्रती आपण अति संवेदनशील व्हाल. मनात रोमान्सची भावना तीव्र होईल. त्यामुळे प्रियव्यक्तीशी जवळीक होण्याची शक्यता आहे. आपण स्वतःसाठी किंवा हौसमौज पूर्ण करण्यासाठी विशेष खर्च करू शकाल. सध्या आपली दृष्टी व्यापक होऊन आपण दुरदृष्टीपणा बाळगू शकाल. चेहेऱ्यावर तेज व मनात उत्साह ह्यांच्या जोरावर जीवनात वाटचाल करा. उत्तरार्धात आपणास आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी बौद्धिक चर्चेत सहभागी व्हावे लागेल, मात्र चर्चे दरम्यान स्वतःचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न टाळावा. विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीचे अडथळे वगळल्यास एकंदरीत आठवडा चांगला आहे.

धनु 

आठवड्यात आर्थिक बाबीत, संततीशी संबंधीत, प्रणयी जीवनाशी संबंधीत तसेच शैक्षणिक क्षेत्रात मध्यम परिणाम मिळतील. आपली शारीरिक व मानसिक स्थिती मध्यम राहील. वारसागत संपत्तीच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात एखाद्या व्यक्तीची मदत होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना नशिबाची साथ मिळाल्याने पूर्वीच्या तुलनेत स्थितीत सुधारणा होत असल्याचे जाणवेल. ज्या व्यक्ती वाणी किंवा संपर्कावर आधारित क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांची कामातील गती मंदावल्याची तक्रार राहील. मात्र, प्रणयी जीवन विशेष आनंददायी नसेल. ह्या दरम्यान विशेषतः प्रियव्यक्तीशी संबंधात अहंकार आडवा येण्याची शक्यता आहे. संतती संबंधित एखादी समस्या निर्माण होण्याची संभावना आहे. मित्र परिवारातील भिन्नलिंगी व्यक्तीशी अधिक जवळीक झाली तरी हा आठवडा नवीन संबंध जुळविण्यासाठी अनुकूल नाही. आजारी व्यक्तींना उपचाराचे परिणाम जाणवणार नाहीत. आपल्या हातून अविचारी सौदे होण्याच्या शक्यतेमुळे सध्या शेअर्स बाजारा पासून दूरच राहावे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करून वाटचाल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

मकर 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण स्वतःकडे विशेष लक्ष द्याल. वस्त्रालंकार किंवा मनोरंजन व हौसमौजेसाठी खर्चाची शक्यता आहे. नवीन ओळखी होऊ शकतील. धनलाभाच्या शक्यतेमुळे आपण आर्थिक चिंतांपासून मुक्त राहून भावी खर्चाचे आयोजन सुद्धा उत्तम प्रकारे करू शकाल. कार्यात यशस्वी झाल्याने आपण आनंदित व्हाल. आर्थिक लाभ व भाग्यवृद्धी संभवते. कामा निमित्त एखादा छोटेखानी प्रवास संभवतो. प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता नसली तरी आपल्या जोडीदारास विविध भेटवस्तू दिल्यास आपला आनंद द्विगुणित होईल. आपण प्रेम करण्या बरोबर योग्य प्रमाणात प्रेम मिळवू शकाल. उत्तरार्धात कामासाठी मनात नवनवीन कल्पना येतील. गुंतवणूक करण्याच्या बाबतीत सुद्धा आपण सक्रिय व्हाल. ह्या आठवड्यात इतरांच्या सहकार्याने आपण अनेक कार्ये पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण आठवडा अनुकूल आहे. आरोग्याच्या बाबतीत आळस व कंटाळा दूर ठेवावा.

कुंभ

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास संबंध व व्यावसायिक बाबतीत हट्टीपणा सोडून समाधानी वृत्ती बाळगावी लागेल. नवीन कार्याचा आरंभ टाळावा. दरम्यान विरोधक सुद्धा डोके वर काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र, तिसऱ्या दिवसापासून परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. आपणास अनुकूल वातावरण मिळाल्याने मनास आनंद, दिलासा व प्रसन्नता लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हावे लागेल किंवा घरातच एखादा छोटासा प्रसंग उदभवेल. नोकरी - व्यवसायात प्राप्तीत वाढ झाल्याने आपण वैभवी किंवा मनोरंजनात्मक वस्तूंसाठी खर्च कराल. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण प्रगतीच्या मार्गावर पोचू शकाल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी सुरवातीस अभ्यासातील परिश्रम वाढवावे लागतील. आठवड्याच्या अखेरीस दैनंदिन कार्यक्रमातून विश्रांती मिळविण्यासाठी आपण एखाद्या मनोरंजनात्मक कार्याचे आयोजन कराल. आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात डोकेदुखी किंवा निद्रानाशाचा त्रास संभवतो. एलर्जीच्या समस्येत थोडा दिलासा मिळेल.

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीस व उत्तरार्धात व्यावसायिक आघाडीवर यशस्वी होऊ शकाल. परंतु, दि.२८ च्या दुपार पासून ते दि.३० च्या संध्याकाळ पर्यंत आपले विचार अस्पष्ट व दिशाहीन असण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर कामाचा भार व ताण ह्यामुळे अपेक्षित कामगिरी आपल्या हातून होऊ शकणार नाही. ह्या दरम्यान आरोग्य व संबंधातील समस्या सुद्धा डोके वर काढतील व त्यामुळे चोहोबाजूने आपण घेरले गेल्याचे जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन काही करण्या ऐवजी जैसे थे स्थितीत राहून व आत्मचिंतन करून समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे हितावह होईल. ह्या दरम्यान आपल्या खर्चात वाढ होण्याची किंवा काही कारणाने पैसे बुडण्याची शक्यता आहे. दि.३१ पासून प्राप्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. आपली निर्धारित कामे सहजपणे पूर्ण होऊ शकतील. त्याच बरोबर आपली जीवनशैली सुद्धा उंचावेल. आपण स्वतःसाठी किंवा वस्त्रालंकारांसाठी, भोजनासाठी, मनोरंजन इत्यादींसाठी खर्च करू शकाल. आठवड्याच्या अखेरीस प्राप्तीच्या संधी मिळाल्याने हाती पैसा शिल्लक राहील. प्रणयी जीवनात पुढील वाटचाल करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी संथ परंतु अथक गतीने लक्षांक गाठू शकतील.

 

Web Title: weekly horoscope 27 september to 3 october 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.