राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 06:15 AM2023-12-04T06:15:50+5:302023-12-04T06:16:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला.

Rajasthan Result: Anti-establishment wave against the Ashok Gehlot government also made the BJP's Win easier | राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

रवी टाले

भारतीय जनता पक्षाचा राजस्थानातील विजय, त्या राज्यातील मतदारांनी रूढ केलेल्या दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याच्या परंपरेला जागणारा असला तरी, काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांनी तो सुकर केल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. वस्तुतः निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात भाजप हा काँग्रेसपेक्षाही जास्त दुभंगलेला पक्ष होता; परंतु त्या पक्षाच्या नेतृत्वाने त्वरेने पावले उचलत, आवश्यक ती तटबंदी करून नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घातला. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्व मात्र त्या बाबतीत हतबल भासत होते आणि ती हतबलताच अखेर पक्षाला भोवल्याचे दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला. त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयांवरील भूमिका मतदारांना भावल्याचे जाणवत आहे. अंतर्गत लाथाळ्यांना आवर घातल्यानंतर, भाजपने मोदींचा चेहरा समोर करून, स्थानिक मुद्दयांवर भर देत अत्यंत परिणामकारक निवडणूक प्रचार यंत्रणा राबविली. अशोक गेहलोत सरकारच्या विरोधातील प्रस्थापितविरोधी लहरीनेही भाजपचे काम सोपे केले. शेतकरी, महिला आणि युवा वर्गात राज्य सरकारच्या विरोधात स्पष्ट रोष दिसत होता. त्याचा लाभ घेण्याचे काम भाजपच्या कुशल निवडणूक यंत्रणेने चोखपणे बजावले. दुसरीकडे काँग्रेसची प्रचार यंत्रणा मात्र अगदीच दिशाहीन भासत होती आणि त्याचेच प्रतिबिंब निकालात उमटल्याचे दिसत आहे. 

भाजपपुढे मुख्यमंत्री पदाचे आव्हान
भाजपला निवडणुकीत विजय मिळाला असला तरी मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार असल्याने पुन्हा मतभेद उफाळू न देण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वाला पेलावे लागणार आहे. अंतर्गत मतभेद उफाळू न देण्यात भाजप नेतृत्व यशस्वी ठरल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला मागील यशाची पुनरावृत्ती करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. कॉंग्रेसलाही अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील मतभेदांवर एकदाचा तोडगा काढावाच लागणार आहे. 

Web Title: Rajasthan Result: Anti-establishment wave against the Ashok Gehlot government also made the BJP's Win easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.