राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 10:25 AM2023-11-26T10:25:37+5:302023-11-26T10:28:23+5:30

आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे.

Rajasthan Assembly Election: 0.9 percent voter turnout in Rajasthan elections, will 20-year trend continue? | राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

जयपूर - राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत राज्यात एकूण ७४.९६ टक्के मतदान झाले. २०१८ च्या निवडणुकीत राजस्थानात ७४.०६ टक्के मतदान झाले होते. म्हणजे या निवडणुकीत ०.९ टक्के जादा मतदान झाले. अशावेळी राज्यात मतदानाच्या ट्रेंडविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

राजस्थानात दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षाचा मतदानाचा ट्रेंड पाहिला तर जेव्हा जेव्हा मतदान टक्केवारी घटली आहे त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला आहे आणि मतदान टक्केवारी वाढली त्याचा फायदा भाजपाला होतो. यावेळच्या निवडणुकीत १८६३ उमेदवार मैदानात उतरले होते. आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे.

१९९ जागांसाठी झाले मतदान
राजस्थानात एकूण २०० जागा आहेत. परंतु मतदान १९९ जागांसाठी झाले. राज्यात २०१३ आणि २०१८ मध्येही १९९ जागांसाठी मतदान झाले होते. यावर्षी निवडणुकीच्या दरम्यान श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर जागेवरील काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कूनर यांचे निधन झाले. अशावेळी निवडणूक आयोगानं येथील मतदान स्थगित केले. कूनर यांनी ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाईल. गुरमीत सिंह विद्यमान काँग्रेस आमदारही होते. त्यांनी २०१८ च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि राज्य सरकारमध्ये मंत्री झाले होते. 

यंदा राजस्थानात सर्वात जास्त जैसलमेर इथं ८२.३२ टक्के मतदान झाले. त्यानंतर प्रतापगड ८२.०७ टक्के, बांसवाडा ८१.३६ टक्के, हनुमानगड ८१.३० टक्के मतदान झाले. राज्यात सर्वात कमी मतदान पाली इथं ६५.१२ टक्के इतके झाले. त्यानंतर सिरोहीत ६६.६२ टक्के, करौली ६८.३८ टक्के, जालोरमध्ये ६९.५६ टक्के आणि सवाई माधोपूर ६९.९१ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्य वर्धन सिंह राठोड, बाबा बालकनाथ, नरेंद्र कुमार, भागीरथ चौधरी, किरोडी लाल मीणा, देवजी पटेल, दीया कुमारी, गौरभ वल्लभ यासारखे नेते मैदानात उतरले आहेत. 

राज्यातला मतदान ट्रेंड काय सांगतो?
राजस्थानातील मतदान ट्रेंड पाहिला तर विधानसभा निवडणुकीत मतदान कमी झाले तर काँग्रेस सरकार बनले आहे. १९९८ च्या निवडणुकीत ६३.३९ टक्के मतदान झाले होते तेव्हा राज्यात काँग्रेस सरकार बनले. गहलोत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २००३ च्या निवडणुकीत ६७.१८ टक्के मतदान झाले तेव्हा भाजपा सरकार बनले. त्यावेळी ३.७९ टक्के मतदान वाढले होते. वसुंधरा राजे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या होत्या. २००८ मध्ये ६६.२५ टक्के मतदान झाले तेव्हा काँग्रेस सरकार बनले. काँग्रेसनं तेव्हा ९६ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाने ७८ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी ०.९३ टक्के मतदान घटले होते. गहलोत दुसऱ्यांदा राज्यात मुख्यमंत्री झाले. 

Web Title: Rajasthan Assembly Election: 0.9 percent voter turnout in Rajasthan elections, will 20-year trend continue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.