Accident: वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन पुढं निघाले, पण वाटेतच...; भीषण अपघातात ३ ठार, २८ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:10 IST2025-12-10T11:09:19+5:302025-12-10T11:10:49+5:30
Rajasthan Bus-truck collision: राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला.

Representative Image
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक अत्यंत भीषण अपघात घडला. जयपूर-बिकानेर राष्ट्रीय महामार्गावर फतेहपूरजवळ एका स्लीपर बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, २८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री अंदाजे ११ वाजता ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी हे गुजरातमधील वलसाड येथील रहिवासी होते. ते सर्व जण वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन परतत होते. यात्रेकरूंचा हा समूह आता खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. स्लीपर बस बिकानेरहून जयपूरकडे जात होती. तर, ट्रक झुंझुनूहून बिकानेरकडे येत होता. फतेहपूरजवळ महामार्गावर दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. बसमध्ये अंदाजे ५० लोक प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच फतेहपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फतेहपूरचे एसएचओ महेंद्र कुमार यांनी सांगितले की, जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या अपघाताचा सखोल तपास सुरू असून, घटनेच्या अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.