मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:50 IST2025-04-30T19:49:25+5:302025-04-30T19:50:05+5:30
Rajasthan Gangrape: मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी परतताना अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी सामूहिक बलात्कार केला.

मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
राजस्थान येथील झालावाडमध्ये मंगळवारी रात्री एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी परतताना हा प्रकार घडला. याप्रकरणी अकलेरा पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पीडिता आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी असल्याचे समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मैत्रिणीच्या लग्नाचे कारण देत घरातून बाहेर पडली. लग्न आटोपल्यानंतर रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ती घराकडे निघाली आणि जवळच्या शेतात शौचास गेली. त्यावेळी जवळ असलेल्या आरोपींनी तिचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेले आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी तब्बल सहा तास तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडिताला बेशुद्ध अवस्थेत घटनास्थळी सोडून आरोपी फरार झाले. पीडिताला शुद्ध आल्यानंतर ती घरी गेली आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आई-वडिलांना सांगितला.
पीडिताच्या आई-वडिलांनी ताबडतोब पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ८७ आणि ७० (२) आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी २० वर्षे वयोगटातील आहे. पीडिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी सर्व ९ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.