पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:56 IST2025-08-08T11:55:26+5:302025-08-08T11:56:42+5:30
पालकमंत्री पदाचा तंटा आता ध्वजारोहण करण्यावरून सुरू झाला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला नक्की ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
अलिबाग : रायगड येथील पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही. सरकार स्थापन होऊन दोन वेळा आदिती तटकरे यांना ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला. मात्र, यंदा १५ ऑगस्ट रोजी फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळावा, अशी अपेक्षा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री पदाचा तंटा आता ध्वजारोहण करण्यावरून सुरू झाला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला नक्की ध्वजारोहण कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिंदेसेना - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच
महायुती सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले. तरीही रायगडचे पालकमंत्री जाहीर झालेले नाहीत. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे बोलून वेळ मारून नेली जात आहे. शिंदेसेनेकडून भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळेल, असा ठाम विश्वास नेते बोलून दाखवत आहेत. पालकमंत्रिपद जाहीर झालेले नसले तरी ध्वजारोहण हे भरत गोगावले यांच्या हस्ते करण्याचा मान मिळावा, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. पालकमंत्री पदीही भरत गोगावले यांनाच नियुक्त करा, अशी भूमिका शिंदेसेनेकडून मांडली जात आहे.