पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:58 IST2025-11-04T20:57:45+5:302025-11-04T20:58:34+5:30
Raigad Crime: रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना घडली आहे. पोटच्या दोन मुलांनीच आईवडिलांची हत्या केली. आईवडिलांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले
Raigad Crime news: म्हसळा तालुक्यातील मेंदडीकोंड गावात रविवारी खळबळ उडाली. एका घरात पती-पत्नीचा सडलेल्या अवस्थेतमध्ये मृतदेह आढळले. माहिती पोलिसांना मिळाली. सुरुवातीला त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सगळ्यांना वाटत होते, पण पोलिसांनी घरात नीट पाहणी केली आणि त्यांची हत्या झाल्याचा संशय आला. त्यानंतर तपास केला आणि त्यांच्याच मुलांनी हत्या केल्याचे उघड झाले.
दोन सख्ख्या भावांनी जन्मदात्या आई-वडिलांचा गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी नरेश महादेव कांबळे (वय ६३, मजूर), चंद्रकांत महादेव कांबळे (६०, निवृत्त कर्मचारी) या आरोपींना केवळ १२ तासांत अटक केली.
मेंदडीकोंड गावातील महादेव कांबळे (९५) आणि विठाबाई कांबळे (८३) यांचे मृतदेह घरात आढळून आले. सुरुवातीला याप्रकरणी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद म्हसळा पोलिसांनी केली होती. पण, पोलिसांनी घटनास्थळ आणि घरात पाहणी केली.
काही गोष्टी शंकास्पद वाटल्या. त्यानंतर फॉरेन्सिक टीम, श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ज्ञ यांच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले. त्यांनी घरातील सर्व खोल्या, पलंग आणि फर्निचरची पाहणी करून पुरावे जमा केले.
पोलिसांनी तपास सुरू केला. घरातील खर्चासाठी पैसे देत नसल्यामुळे मयत दाम्पत्याने दोन्ही मुलांना घरात राहू नका म्हणून सांगितले. त्यामुळे दोघांच्या मनात राग निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांनी हे कृत्य केले.
या प्रकरणी मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (४०, रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन) हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.