कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 06:39 IST2025-07-08T06:38:48+5:302025-07-08T06:39:25+5:30

दिल्ली कोस्ट गार्डमधून जिल्हा पोलिसांना संशयित बोट अरबी समुद्रात आली असल्याचा मेसेज ८.५५ मिनिटांनी मिळाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली

Suspicious boat in Korlai sea?; Coast Guard, Navy helicopters search, nothing found | कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही

कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही

अलिबाग : कोर्लई समुद्रात संशयित बोट आल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ उडाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. समुद्रात दोन नॉटिकल अंतरावर ही बोट संशयास्पदरीत्या उभी असल्याचे बोलले जात होते. मात्र, सोमवारी दिवसभर संशयित बोटीचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नाही. खबरदारी म्हणून कोस्ट गार्ड, नेव्ही, पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. नाक्यानाक्यावर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. संशयित काही आढळल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहनही जिल्हा पोलिसांनी केले आहे.

दिल्ली कोस्ट गार्डमधून जिल्हा पोलिसांना संशयित बोट अरबी समुद्रात आली असल्याचा मेसेज ८.५५ मिनिटांनी मिळाला होता. त्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. कोर्लई येथील समुद्रात पोलिसांकडून बोटीने सर्च ऑपरेशन सुरू झाले. सोबत कोस्ट गार्ड आणि नेव्हीच्या हेलिकॉप्टरने संशयित बोटीचा शोध सुरू झाला. मात्र, बोट कुठेही सापडली नाही.

ब्लिंक होणारी लाइट कशाची? 
संशयित बोटही दोन नॉटिकलपर्यंत उभी आहे. तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मध्ये खडक असल्याने पुढे जाणे जमले नाही. बोटीमधून लाइट ब्लिंक होत आहे.  समुद्रात मच्छी पकडण्यासाठी जाळे टाकून बोया टाकले जातात. त्यावर लाइट लावून जीपीएस सिस्टीम लावली जाते. जेणेकरून दुसऱ्या बोटीला कळावे, यासाठी ही उपाययोजना केली जाते. त्यामुळे रात्री दिसणारी लाइट ही बोयाची असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

संशयित बोट नाही, तो होता बोया 
कोर्लई समुद्रकिनाऱ्यापासून तीन नॉटिकल मैलावर रविवारी रात्री दिसलेली वस्तू संशयित बोट नसून तो मासेमारी जाळीचा बोया आहे. तो वर्ग आणि एआयएस ट्रान्सपाँडर्ससह वाहून आल्याचे भारतीय तट रक्षक दलाने कळविले आहे.  तसेच यापूर्वीही  दि. ३ जानेवारी २०२५ रोजी अशाप्रकारचा बोया ओखा-गुजरात येथे आढळून आला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भारतीय तटरक्षक सुरक्षा दल दिल्ली यांच्याकडून दि. ६ जुलैला २०.५२ रायगड जिल्हा पोलिस कार्यक्षेत्रामधील कोर्लई किल्ला येथे साधारणतः अडीच ते तीन नॉटिकल मैल समुद्रात एक संशयित पाकिस्तानी बोट (मुक्कदर बोया ९९, नंबर एमएमएसआय ४६३८००४११) असल्याबाबत माहिती मिळाली. 
हा अतिसंवेदनशील प्रकारचा अलर्ट असल्याने रायगड जिल्हा पोलिस दलाकडून सर्व पोलिस ठाणे हद्दीत तसेच सागरी व खाडी किनारी भागात अशा १९ ठिकाणी सशस्त्र नाकाबंदी नेमण्यात आली. रायगड जिल्हा पोलिस दलातील ५२ अधिकारी, ५५४ पोलिस अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून शोधमोहीम राबविण्यात आल्याचेही पोलिस प्रशासनाने सांगितले.

माहिती मिळताच आयजी संजय दराडे, जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे कोर्लई समुद्रकिनारी दाखल झाले होते. जिल्हा पोलिसांनी मच्छीमार सोसायट्यांची बैठक घेऊन काय संशयास्पद आढळले, तर कळवावे अशा सूचना केल्या. नागाव येथून पाच संशयितांना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र त्याच्याकडून कोणतीही संशयास्पद माहिती न मिळाल्याने त्यांना सोडून देण्यात आले. 

दिल्लीवरून कोस्ट गार्ड कार्यालयातून संशयित बोट रायगडच्या समुद्रात आल्याचा मेसेज आला. त्यानुसार पोलिस यंत्रणा सज्ज झाली होती. कोर्लई येथील समुद्रात पोलिस, नेव्ही, कोस्ट गार्ड विभागातर्फे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. मात्र बोट सापडली नाही. जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जाहीर केला आहे.  - आँचल दलाल,जिल्हा पोलिस अधीक्षक

Web Title: Suspicious boat in Korlai sea?; Coast Guard, Navy helicopters search, nothing found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस