शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा रुग्णालयात मृत्यू, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:15 IST2024-03-04T10:06:11+5:302024-03-04T10:15:05+5:30

आमदार दळवी हे शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते.

MLA Mahendra Dalavi's car hit a bike rider; Youth died in hospital raigad | शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा रुग्णालयात मृत्यू, गुन्हा दाखल

शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; युवकाचा रुग्णालयात मृत्यू, गुन्हा दाखल

मुंबई/रायगड - शिवसेना शिंदें गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ शनिवारी हा अपघात घडला. आमदार महोदयांच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी, आमदार दळवी यांच्या कारच्या चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र दळवी हे मुरुड -अलिबाग मतदारसंघाचे आमदार आहेत. 

आमदार दळवी हे शनिवारी मुरुड- नांदगाव येथील साळाव आगरदांडा रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी उसडी गावानजीकच्या टोलनाक्याच्या परिसरात महेंद्र दळवी यांच्या गाडीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. जासीम अब्दुल रहेमान पासवारे असे दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघातात पासवारे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, आमदार दळवी यांच्या गाडीचालकाविरोधात गुन्हाही दाखल केल्याचे समजते. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे. 

Web Title: MLA Mahendra Dalavi's car hit a bike rider; Youth died in hospital raigad