मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:49 IST2025-12-26T13:48:27+5:302025-12-26T13:49:53+5:30
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले गेल्या २४ दिवसांपासून फरार असून, पोलीस शोध घेत आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठावठिकाणा पोलिसांना सापडलेला नाही.

मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
शिंदेसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले तीन आठवड्यांपासून फरार आहेत. न्यायालयाने त्यांचा जामीनही नाकारला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून, २४ दिवस उलटले तरी पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. २ डिसेंबर २०२५ रोजी महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. २९ जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल असून, विकास गोगावले तेव्हापासून फरार आहेत.
महाड नगरपरिषद निवडणुकीच्या दिवशी ही घटना घटना घडली होती. मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक २ मध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी २९ जणांविरोधात गु्न्हा दाखल केलेला असून, त्यात विकास गोगावले यांचाही समावेश आहे.
माणगाव कोर्टाने दोन वेळा फेटाळला जामीन
विकास गोगावले या मारहाण प्रकरणापासून फरार आहेत. दरम्यान, त्यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. माणगाव न्यायालयाने त्यांचा दोन वेळा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
निवडणुकीच्या दिवशी विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत. महाड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.