Mangesh Kalokhe Murder: मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:52 IST2025-12-29T09:51:59+5:302025-12-29T09:52:28+5:30
Mangesh Kalokhe Murder Case: पाच पोलिस पथकांनी तांत्रिक तपासाद्वारे शिताफीने आवळल्या मुसक्या

Mangesh Kalokhe Murder: मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
अलिबाग/खोपोली : खोपोली येथे शुक्रवारी (२६ डिसेंबर) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास मंगेश सदाशिव काळोखे यांचा राष्ट्रवादी (अजित पवार)च्या कार्यकर्त्यांनी राजकीय वैमनस्यातून खून केला. या घटनेनंतर खोपोलीतील राजकारण तापले. याप्रकरणी दहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर चोवीस तासांच्या आत नऊ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींना रविवारी (२८ डिसेंबर) खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना अटक केलेली नाही.
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ५ पोलिस पथके स्थापन करण्यात आली होती. पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपींनी मोबाइल बंद करून मुंबईच्या दिशेने पळ काढल्याचे समोर आले. मात्र, त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अशा कठीण परिस्थितीतही तपास पथकाने तपास कौशल्याचा वापर करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा अत्यंत कौशल्याने तपास केला. सीसीटीव्ही फुटेल, उपलब्ध पुरावे. तसेच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून शिताफीने सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले.
रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी घायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे व दिलीप हरिभाऊ पवार यांच्या २४ तासांच्या आत मुसक्या आवळण्यात पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना यश आले आहे.
जुने दिवस पुन्हा : वीस-पंचवीस वर्षांपूर्वी कोणतीही निवडणूक झाली की दोन गटांत हाणामारी होत असे. त्यानंतर कोर्ट-कचेरीमध्ये दोन्हीकडचे कार्यकर्ते पिसले जात. पुढारी मात्र नामानिराळे राहत. गेली पंधरा वर्षे अशा घटना बंद झाल्या. मात्र, पुन्हा एकदा जुने दिवस सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र आहे.
पुढचा नंबर भासेचा, ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ
कर्जत : मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्टमुळे वातावरणात अधिक तणाव वाढला असून ‘ती’ पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)चे कार्यकर्ते महेंद्र घारे यांनी सोशल मीडियावरील एका कमेंटमध्ये ‘पुढचा नंबर भासे’चा असा धमकीचा मजकूर लिहिल्याचे निदर्शनास आले. या धमकीमुळे कर्जत शहरातही भीती व अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथील नगरसेवक संकेत भासे आणि शिंदेसेनेच्या वतीने कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच कर्जत पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात महेंद्र घारे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख करून त्यांच्या सोशल मीडियावरील धमकीची सखोल चौकशी करून तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.