Vidhan Sabha 2019: शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकेना..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:14 PM2019-09-23T23:14:29+5:302019-09-23T23:14:55+5:30

अलिबाग, पेण, उरणमध्ये भाजपच्या उमेदवारीची चर्चा : शिवसेना उमेदवारांची धाकधूक वाढली, आघाडीचे देव पाण्यात

Maharashtra Vidhan Sabha 2019 Shiv Sena BJP alliance horses not moving forward! | Vidhan Sabha 2019: शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकेना..!

Vidhan Sabha 2019: शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकेना..!

Next

- आविष्कार देसार्ई 

अलिबाग : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असतानाही अद्याप शिवसेना-भाजप युतीचे घोडे पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. अलिबाग, पेण आणि उरण विधानसभेच्या जागा लढण्यासाठी भाजपकडून अनुक्रमे अ‍ॅड. महेश मोहिते, रवींद्र पाटील आणि महेश बालदी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

शिवसेना-भाजप यांची युती होणार की नाही याबाबतचे गूढ अद्यापही कायम असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘युती विरोधात आघाडी’ अशी लढत होणार आहे. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झालेली आहे; मात्र शिवसेना-भाजप युतीची घोषणा अद्यापही झाली नाही. शिवसेना-भाजप यांची युती न होणेच आघाडीसाठी फायद्याचे असल्याने त्यांनीही देव पाण्यात बुडवून ठेवल्याचे बोलले जाते.

अलिबाग विधानसभा मतदारसंघाची जागा १९९० पासून शिवसेना लढवत आली आहे. मात्र त्यामध्ये त्यांना एकदाही विजय संपादित करता आलेला नाही. तसेच उरण मतदारसंघाची २००९ साली पुनर्रचना झाल्यानंतर शिवसेनेने २०१४ साली प्रथम ही खिंड लढवली होती. त्या वेळी शिवसेनेचे मनोहर भोईर हे निवडून आले. पेण विधानसभा मतदारसंघावर नजर टाकल्यास १९९० साली प्रथम भाजपने ही जागा लढवली होती. त्यानंतर १९९५ साली पुन्हा भाजपच्याच वाट्याला हा मतदारसंघ आला होता. नंतर १९९९, २००४ आणि २००९ साली शिवसेनेने येथे नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता.

अलिबाग, पेण आणि उरण मतदारसंघाचा विचार केल्यास उरण वगळता शिवसेनेला अन्य ठिकाणी यश आल्याचे दिसत नाही. जागावाटपाचे अद्यापही पक्के झालेले नाही. आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपला या तीन जागा खुणावत असल्याचे बोलले जाते. उरण मतदारसंघामध्ये भाजपचे महेश बालदी, अलिबागमध्ये भाजपचेच अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नावाची चर्चा आहे. त्यादृष्टीने त्यांनी कामही सुरू केले आहे. तर पेण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने उमेदवारीचा शब्द दिल्याने त्यांनीही तयारी सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसते. अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून या जागेवर दावा सांगितला जात असल्याचे समजते. परंतु उरणमध्ये सध्या शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचाच हक्क अधिक आहे. तर पेणमध्ये रवींद्र पाटील हे भाजपमध्ये आल्याने भाजपसह पाटील यांचीही ताकद वाढली. पेण आणि अलिबाग या जागेवर शिवसेना लढत आली आहे मात्र त्यांना विजय संपादन करता आलेला नाही. पाटील यांना उमेदवारीचा दिलेला शब्द आणि पाटील यांनी सुरू केलेली तयारी यामुळे युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अलिबागच्या जागेवरही भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी तयारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी आणि दुसरे इच्छुक उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांची धाकधूक वाढली आहे.

युती न झाल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होणार
शिवसेना-भाजपची युती न झाल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा हा थेट आघाडीच्या उमेदवारांना मिळणार आहे. जोपर्यंत युतीच्या जागांबाबत स्पष्ट होत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले; तर शिवसेना आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजप यांची युती होणार की नाही याबाबतचे गूढ अद्यापही कायम असल्याने सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Shiv Sena BJP alliance horses not moving forward!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.