नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:18 IST2025-11-28T12:17:25+5:302025-11-28T12:18:10+5:30
शिंदेसेनेत गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या स्वागत रॅलीला अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
म्हसळा - रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. त्यातच शिंदेसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. म्हसळा तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे नगर पंचायतीचे राजकारण रंगतदार बनले आहे. याठिकाणी नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर २ दिवसांनी खासदार सुनील तटकरे यांनी शिंदेसेनेचे तालुकाप्रमुखासह महिला आघाडी, विभागप्रमुख, शहरप्रमुख यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला.
शिंदेसेनेत गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या स्वागत रॅलीला अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हसळा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता.
रॅली नगर पंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर घोषणाबाजी
शिंदेसेनेत गेलेल्या नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार आणि स्वागत रॅली पेट्रोल पंप ते नगर पंचायत कार्यालयापर्यंत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. ही रॅली नगर पंचायत कार्यालयासमोर आल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हा शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनीही घोषणा दिल्या. त्यामुळे बाजारपेठेत तणाव निर्माण झाला.
दरम्यान, मंत्री गोगावले यांनी स्वतः नगर पंचायत कार्यालयात जाऊन नगराध्यक्षा फरहीन बशारथ यांना त्यांच्या आसनावर बसवले. तालुक्यात आणखी काही गावांमधील कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, अनिल नवगणे, युवा सेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, सचिन पाटेकर, अविनाश कोळंबेकर, अमोल पेंढारी, अक्रम साने, बाबू बनकर, दीपेश जाधव, अमित महामुनकर, अकमल कादरी, सर्व नगरसेवक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.