"निवडणुकीत हरवू शकले नाहीत, म्हणून संपवलं"; काळोखेंच्या हत्येनंतर भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीवर थेट हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:09 IST2025-12-26T15:03:03+5:302025-12-26T15:09:04+5:30
खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची निर्घृण हत्या

"निवडणुकीत हरवू शकले नाहीत, म्हणून संपवलं"; काळोखेंच्या हत्येनंतर भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीवर थेट हल्ला
Raigad Crime: रायगडच्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि संतापजनक घटना घडली. शिंदेसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, यामागे राजकीय वैमनस्य असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
शाळेतून परतताना हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. मुलाला शाळेत सोडून ते दुचाकीवरून घराकडे परतत असताना, वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना गाठले. एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी काळोखे यांना अडवले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी तुटून पडले. या भीषण हल्ल्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला.
मंत्री भरत गोगावले यांचा राष्ट्रवादीवर थेट आरोप
या हत्येच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी या प्रकरणावर बोलताना अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "राष्ट्रवादी काँग्रेसला खोपोलीतील पराभव जिव्हारी लागला असून, त्यातूनच हा राजकीय सूड उगवण्यात आला असावा," असे खळबळजनक विधान गोगावले यांनी केले आहे. या हत्याकांडामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा दावा त्यांनी केल्यामुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे.
"काखोळे यांना ते निवडणुकीत पराभूत करु शकले नाहीत. ते राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलं असावं असं मला वाटतं. हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार तिथे उभे होते. कदाचित मंगेश काळोखेनेच मागच्या वेळी आमचे आमदार महेंद्र थोरवे यांना विजय मिळवून देण्यासाठी खोपोलीमधून साडेसहा हजारांचा लीड मिळवून दिला होता. आताही सत्ता आणण्यामध्ये मंगेश काळोखेचा सिंहाचा वाटा होता. म्हणून अशी खेळी करुन त्यांनी हा डाव साधला, असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोर काळ्या रंगाच्या गाडीतून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या माहितीवरून पोलिसांनी शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर आणि बाहेर जाणाऱ्या मार्गांवर कडक नाकेबंदी केली आहे. ही हत्या निवडणुकीतील विजयाच्या रागातून झाली की यामागे अन्य काही जुने वाद आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
निवडणुकीनंतर हिंसक वळण
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मानसी काळोखे यांनी शिंदे गटाकडून विजय मिळवला होता. मंगेश काळोखे हे स्वतः अनुभवी नेते आणि माजी नगरसेवक असल्याने शहरात त्यांचे मोठे वर्चस्व होते. दुसरीकडे रायगडमध्ये पुन्हा एकदा महायुतीमध्ये खदखद पाहायला मिळत आहे.