श्री एकवीरा मंदिर परिसराच्या देखभालीसाठी निधी मिळावा

By admin | Published: March 25, 2017 01:33 AM2017-03-25T01:33:29+5:302017-03-25T01:33:29+5:30

मावळ लोकसभा मतदार संघातील लोणावळ्याजवळील कार्ला व भाजे या ऐतिहासिक पांडवकालीन लेण्या आजही अस्तित्वात आहेत.

Get funds for the maintenance of Shri Ekvira Temple | श्री एकवीरा मंदिर परिसराच्या देखभालीसाठी निधी मिळावा

श्री एकवीरा मंदिर परिसराच्या देखभालीसाठी निधी मिळावा

Next

कर्जत : मावळ लोकसभा मतदार संघातील लोणावळ्याजवळील कार्ला व भाजे या ऐतिहासिक पांडवकालीन लेण्या आजही अस्तित्वात आहेत. या लेण्यांच्याच बाजूला सुप्रसिद्ध श्री एकवीरा देवीचे पुरातन मंदिरदेखील आहे. या लेण्यांच्या व मंदिराच्या परिसरात पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी व भारतीय संस्कृतीच्या ठेवा असलेल्या या लेण्यांचे दुरु स्ती व संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकारच्या संकलित निधीतून अथवा वारसा शहर विकास आणि योजनेअंतर्गत निधी उपलब्ध व्हावा यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते.
पौराणिक ग्रंथांमध्ये पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी या मंदिराची निर्मिती केली, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. हे मंदिर पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित करण्यात आले असून कार्ला लेण्या व प्राचीन बौद्ध गुफांनी वेढलेले आहे. तसेच महामंडप, वर्षामंडप व गोपूर नावाने प्रसिद्ध असलेल्या तीन धार्मिक स्थळांसमोर मंदिर आहे. मंदिर व लेण्या या डोंगरावर असल्याने तेथे जाण्यासाठी जवळपास ५०० पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या बऱ्याच ठिकाणी झिजलेल्या व कमी-जास्त अंतरावर असल्याने भाविकांना पायऱ्या चढ-उतार करणे धोक्याचे वाटू लागले आहे. या पायऱ्यांना देखील दुरुस्ती व देखभालीची आवश्यकता आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील श्री एकवीरा देवी आगरी समाजाचे कुलदैवत असल्याने रायगड, मुंबई, कोकण व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक व राजस्थानातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक व पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात; परंतु कार्ला लेणी व एकवीरा मंदिर यांचे गेल्या काही वर्षांपासून पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित झाल्याने पर्यटन क्षेत्र म्हणून हवी तशी चालना मिळालेली नाही. नवरात्रीच्या काळात भाविकांची संख्या अनेक पटींनी वाढते. (वार्ताहर)

Web Title: Get funds for the maintenance of Shri Ekvira Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.