लग्नकार्यातही आता सोशल मीडिया, रिल्सचा बोलबाला; फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात

By निखिल म्हात्रे | Published: May 21, 2024 12:24 PM2024-05-21T12:24:25+5:302024-05-21T12:29:26+5:30

तरुण पिढी आपल्या आयुष्यातील असंख्य क्षण, घटना व बाबी रील्सद्वारे सर्वांसमोर मांडते

Even in marriage now social media Instagram reels capturing limelight so Photographers business in crisis | लग्नकार्यातही आता सोशल मीडिया, रिल्सचा बोलबाला; फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात

लग्नकार्यातही आता सोशल मीडिया, रिल्सचा बोलबाला; फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: - धकाधकीच्या व सोशल मीडियाच्या युगात आता सर्व काही इन्स्टंट म्हणजेच लागलीच हवे आहे. पूर्वी लग्नकार्यात फोटोशूटबरोबरच व्हिडिओ शूटिंगलादेखील महत्त्व आणि मागणी होती. मात्र, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप आदी सोशल मीडियाच्या जमान्यात चार ते पाच तासांचा व्हिडिओ पाहण्यापेक्षा एका मिनिटात सर्व काही समाविष्ट असलेल्या रील्सना प्रचंड मागणी वाढली आहे.

सर्वत्रच रील्सचा बोलबाला दिसत आहे. तरुण पिढी आपल्या आयुष्यातील असंख्य क्षण, घटना व बाबी रील्सद्वारे सर्वांसमोर मांडते. यामध्ये आता स्वतःच्या लग्नाचा समावेश देखील झाला आहे. लग्नाचे प्रीवेडिंग शूट असो की हळद, वरात, प्रत्यक्ष लग्नविधी ते अगदी डोहाळे जेवण सर्वच गोष्टी आता ६० सेकंदाच्या रील्समध्ये कल्पकतेने बसवून प्रदर्शित व व्हायरल केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यासाठी खर्च देखील पूर्ण व्हिडिओ शूटिंगच्या खर्चापेक्षा खूप कमी होतो आणि परिणाम मात्र मोठा असतो. शिवाय लागलीच सर्वांपर्यंत हे आनंदी व अविस्मरणीय क्षण अनोख्या पद्धतीने समाजमाध्यम व इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून पोहोचविता येतात. म्हणूनच रील्सची क्रेझ वाढली आहे. फक्त मनोरंजन आणि व्यावसायिक दृष्टिकोनाने बनविले जाणारे रोल्स आता लग्नसमारंभ व घरगुती कार्यक्रमांसाठीसुद्धा वापरले जातात. त्यामुळे आता रील्सना अधिक पसंती दिली जात आहे.

एका लग्नाचे चार भाग- साधारण एका लग्नाच्या चार रील्स होतात. हळदी समारंभाची एक रील, लग्नात नवरा व नवरीचा प्रवेशाची एक रील, प्रत्यक्ष लग्न समारंभापासून ते सप्तपदी किंवा मंगळसूत्र घालणे आदी लग्नाच्या सर्व विधी होईपर्यंतचा रील आणि रिसेप्शनसाठी मंडपात किंवा हॉलमध्ये नवरा-नवरीचा प्रवेश हे महत्त्वाचे चार प्रत्येकी एक मिनिटांचे रील्स बनवले जातात.

अवघ्या चार मिनिटांत लग्न सोहळा पार- आकर्षक व लक्षवेधी कोणत्याही रील्सचा अवधी हा आता ६० सेकंदाचा करण्यात आला आहे. याआधी तो केवळ ३० सेकंदाचा होता. या एक मिनिटांमध्ये संपूर्ण लग्नसमारंभ अतिशय खुबीने बसविला जातो. त्यामुळे अवघ्या चार ते पाच मिनिटांत संपूर्ण लग्नसमारंभ डोळ्यासमोर येतो व लक्षवेधी ठरतो, तोही अगदी आकर्षक पद्धतीने, त्यामुळे लग्नाची संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करण्यापेक्षा रील्सला अधिक पसंती मिळताना दिसून येत आहे.

फोटोग्राफर्सचा व्यवसाय संकटात- सर्वांकडे उपलब्ध असलेले अँड्रॉइड किंवा आय फोनद्वारे रील्स बनविले जातात. त्यामुळे यासाठी अतिरिक्त खर्च येत नाही. शिवाय एडिटिंगची कला अवगत असलेले कोणीही ते सहज बनवू शकते. फोटोग्राफर्सना आता व्हिडिओ शूटिंगच्या फार ऑर्डर येणे बंद झाले आहेत. रील्स बनवण्यासाठी ऑर्डर आली तरीदेखील त्याचे पैसे फारसे मिळत नाहीत. वेळ मात्र जास्त द्यावा लागतो. काही जण स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून रील्स एडिट करण्यासाठी फोटोग्राफरला देतात. या सर्वांमुळे फोटोग्राफरचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

अद्ययावत प्रशिक्षण गरजेचे- फोटोग्राफर्सने या बदलत्या परिस्थितीचा सामना करावा, यासाठी रील्स कसे बनवायचे, त्याची एडिटिंग कशी करायची, साऊंड इफेक्ट कशाप्रकारे द्यायचा, आदी प्रशिक्षण घेणे आता गरजेचे झाले आहे.

कालाच्या ओघात झालेले बदल स्वीकारले आहेत. यामध्ये काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहोत. या संदर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान व कलाकौशल्य आत्मसात केले आहे. ज्यामुळे या बदललेल्या परिस्थितीचा सामना चांगल्याप्रकारे करू शकतो. ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना रील्स योग्यप्रकारे करून देतो.
- विवेक सुभेकर, महासंघ महाराष्ट्र कार्याध्यक्ष फोटोग्राफर्स.

Web Title: Even in marriage now social media Instagram reels capturing limelight so Photographers business in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.