उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतही मोबाइलच हाती, मुलं खेळणं-बागडणं विसरली!

By निखिल म्हात्रे | Published: May 24, 2024 09:23 AM2024-05-24T09:23:56+5:302024-05-24T09:24:20+5:30

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता सतावू लागली आहे.

even during the summer vacations children forget to play and play with their mobiles | उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतही मोबाइलच हाती, मुलं खेळणं-बागडणं विसरली!

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतही मोबाइलच हाती, मुलं खेळणं-बागडणं विसरली!

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: उन्हाळी सुटीमध्ये क्रिकेट, कबड्डी खेळणे, पोहणे असे खेळ खेळण्याऐवजी बच्चे कंपनी मोबाइलमधील विविध प्रकारच्या 'गेम'मध्ये अडकली आहेत. मोबाइलच्या वेडापायी मुले तहान, भूकही विसरू लागली आहेत. त्यामुळे पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता सतावू लागली आहे.

हल्ली मोबाइल आणि मुले हे एक समीकरणच बनले आहे. मोबाइलवर वेगवेगळ्या प्रकारचे 'गेम' खेळण्यात मुले एवढी व्यस्त असतात की, समोरून एखाद्याने हाक मारली तरी त्यांना उत्तर देत नाहीत. लहान मुलांबरोबरच महाविद्यालयीन तरुण-तरुणीही मोबाइलच्या प्रेमात इतके वेडे बनले आहेत की, पालकांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे.

शहरातील नाना-नानी पार्क, अलिबाग किनारा येथे सायंकाळच्या सुमारास आपल्या पालकांबरोबर फिरायला येणारी बहुतांश लहान-मोठी मुले बाकावर बसून मोबाइलमध्ये गुंतलेली दिसतात. पालक बागेत नाहीतर समुद्रकिनारी फेरफटका मारत असतात तर मुले बाकावर बसून मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. मुलांच्या मोबाइल वेडापायी पालकांना त्यांच्या आरोग्याची चिंता सतावू लागली आहे.अनेकदा तहान-भूक विसरून ही लहानसहान मुले स्मार्ट फोनमध्येच गुंतलेली दिसतात. तहान, भूक विसरून ही मुले तासनतास एका जागेवर बसत असल्याने त्यांना मानेचा, पाठीचा आणि डोळ्यांचा आजार उद्भवू लागला आहे. सर्रास सगळ्या मुलांमध्ये दिसणारे हे मोबाइलचे वेड सध्या पालकांसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब बनले आहे.

एकत्र येतात पण...

शहरातील उद्यान, इमारतीच्या टेरेसवर, पार्किंगमध्ये, रस्त्याच्या कडेला, वाहनांवर बसून किशोरवयीन मुले, तरुण आणि तरुणी एकत्र येतात. मात्र, ही मुले मौजमस्ती करण्याऐवजी मोबाइलमध्येच गुंतलेली असतात. एकत्र येऊनही ही मुले चॅटिंग किंवा गेममध्येच अडकलेली असतात. ही बाब चिंतेची बनली आहे.

मुले मोबाइलचा अतिवापर करत असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मुलांची दृष्टी कमी होणे, शारीरिक हालचाली कमी झाल्याने आळशीपणा वाढला आहे. अतिवापरामुळे ब्रेनट्यूमर होण्याची, निद्रानाश तसेच कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम, डोकेदुखी तसेच मानेचे दुखणेही निर्माण होऊ शकते. - डॉ. आरती सिंह, मानसोपचारतज्ज्ञ.

Web Title: even during the summer vacations children forget to play and play with their mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.