रायगडमध्ये आंबा बागायती लागवडीसाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 11:39 PM2021-04-20T23:39:04+5:302021-04-20T23:39:09+5:30

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत

Efforts should be made for mango cultivation in Raigad | रायगडमध्ये आंबा बागायती लागवडीसाठी प्रयत्न व्हावेत

रायगडमध्ये आंबा बागायती लागवडीसाठी प्रयत्न व्हावेत

Next

- श्रीकांत नांदगावकर   
लोकमत न्यूज नेटवर्क
तळा : रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायती पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे.
रायगड जिल्ह्यात जवळपास आठ हजार ७९ हेक्टरवर आंबा बागायतीचे नुकसान झाले. यावर्षी आंबाही ४० टक्के लागला असल्याची माहिती कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली. येथील शेतकरी भातपिकांबरोबरच आंबा हे पीक उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत; पण आता या शेतकऱ्यांना आर्थिक साधन काहीच उरलेले नाही.
शासनाकडून या चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदार शेतकरी बांधवांना प्रतिझाडामागे फक्त ५०० रुपये देऊन सहानुभूती दाखवली गेली आहे; परंतु या शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत ही लागवड न देता राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत बागा पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
ही आंबा बागायती शेती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी खड्डे खोदणे, लागवड करणे, कुंपण करणे, त्याचबरोबर किमान तीन वर्षे पाणी देणे, सावली करणे, खत देणे, फवारणी करणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. ही कामे रोजगार हमी योजनेंतर्गत लागवड करून पैसे मिळत नाही. शिवाय त्यासाठी जमीन दोन हेक्टरची मर्यादा असते. म्हणून शासनाने या शेतकऱ्यांना मोठ्या योजनेत बसवून लागवडीला प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून शेतकरी ही लागवड करू शकेल. त्याला तशी आर्थिक मदत मिळेल व गेलेल्या बागा पुन्हा उभारी घेतील. यासाठी अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


तळा तालुक्यात ६२० हेक्टरवर आंबा लागवड असून, निसर्ग वादळाने ३११.३६ हेक्टरचे आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याचे ठरविले आहे. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान दिले जाणार आहे. तशी यावर्षीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.    - सागर वाडकर, मंडळ अधिकारी

आंबा बागायती निसर्गाच्या कोपाने उद्ध्वस्त झाल्या; परंतु त्या पुन्हा लागवडीखाली आणून शेतकरी सक्षम बनविणे गरजेचे आहे. राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यासाठी प्रयत्न केला तरच शेतकरी बांधव यासाठी तयार होतील.    - मारुती वरंडे, आंबा बागायतदार

चक्रीवादळाच्या तडाख्याने जमीनदोस्त झालेल्या आंबा बागायतदारांना प्रतिझाडामागे ५०० रुपये देऊन १५ वर्षांचे झाड कायमचे गेले तर यासाठी झालेली मेहनत लक्षात घेता ही लागवड राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत बसवून शेतकरी बांधवांना आर्थिक आधार द्यावा.
- कृष्णा चाळके, नुकसानग्रस्त शेतकरी.
 

Web Title: Efforts should be made for mango cultivation in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.