drains water in Kharghar | खारघरमध्ये जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी
खारघरमध्ये जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी

पनवेल : खारघर सेक्टर १० मध्ये जिओ फोर-जी लाइनचे काम सुरू आहे. खोदकाम करताना येथील तुलसी कमल बिल्डिंगसमोर सिडकोची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

खोदकाम करताना सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला विश्वासात न घेता, हे खोदकाम केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. जलवाहिनी फुटल्यानंतरसुमारे तासभर रस्त्यावर पाणी वाहत होते. खारघरमध्ये मागील काही महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील रहिवाशांनी गेल्या महिन्यातच अपुऱ्या पाण्याअभावी सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. हा प्रश्न अद्यापि सुटलेला नाही. यातच बेजबाबदारपणे खोदकाम करून हजारो लीटर पाण्याची नासाडी केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

या घटनेचा सेक्टर १० मधील नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. संध्याकाळी या भागातील काही इमारतींना कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आल्याचे तुलसी कमल बिल्डिंग मधील रहिवासी सुरेश ठाकूर यांनी सांगितले. बेजबाबदारपणे काम करणाºया संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुमित मोरवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्याविरोधात कारवाई करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलवाहिनी फुटल्यानंतर खोदकाम करणाºया कर्मचाऱ्यांनी येथून पळ काढल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी गजानन दलाल यांना विचारणा केली असता, संबंधित काम स्थगित ठेवण्याचे आदेश जिओ फोर-जीच्या कंत्राटदाराला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: drains water in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.