धावत्या रेल्वेत प्रसूती, कन्यारत्न जन्मताच प्रवाशांत आनंदोत्सव; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये डॉक्टर ठरले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 10:11 IST2025-12-17T10:09:27+5:302025-12-17T10:11:51+5:30
त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला अन् नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

धावत्या रेल्वेत प्रसूती, कन्यारत्न जन्मताच प्रवाशांत आनंदोत्सव; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये डॉक्टर ठरले देवदूत
कर्जत : रेल्वेचा प्रवास, रात्रीची वेळ अन् अचानक एका गर्भवतीला प्रसूतीकळा सुरू झाल्या. वेदनांनी विव्हळणाऱ्या तीला पाहून डब्यात घबराट पसरली. मात्र, याच डब्यात प्रवास करणारे सायन येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत बोडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी रेल्वेच्या धावत्या डब्यात मर्यादित साधनांमध्ये प्रचंड ताणतणावात महिलेची प्रसूती केली. त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला अन् नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
सोलापूर-मुंबई धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये घडलेला हा प्रसंग केवळ वैद्यकीय नव्हे, तर माणुसकीचा जिवंत दाखला ठरला असून, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अत्यंत संयमाने धाडसी निर्णय घेऊन मर्यादित साधनांमध्ये दोन जिवांना वाचवून देवदूत ठरलेल्या डॉक्टरचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सोरेगाव येथील गर्भवती महिला दीक्षा बनसोडे ठाणे येथे येण्यासाठी सोलापूरहून निघाल्या होत्या. कर्जत स्थानक सोडल्यानंतर अचानक त्यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे प्रवासीही घाबरले. मात्र, याच डब्यातून प्रवास करणारे डॉ. प्रशांत बोडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधला. नेरळ स्थानकात कर्तव्यावर असलेले रणजीत कुमार शर्मा यांनीही तत्काळ समन्वय साधला. ट्रेन कर्जत व नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान असताना न डगमगता इथेच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय डॉ. बोडगेंनी घेतला.
समन्वयामुळे टळला अनर्थ
प्रसूतीनंतर आई व बाळ दोघांनाही नेरळ स्थानकात उतरवून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण प्रसंगात डॉक्टरांची तत्परता, धैर्य आणि माणुसकी खऱ्या अर्थाने 'देव' ठरली. आई आणि नवजात बाळावर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर संगीता मेंढी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले. यानंतर महिलेला व बाळाला त्यांच्या कुटुंबासोबत ठाणे येथे पाठविण्यात आले.