‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ने केली मंगेश काळोखेंची हत्या; राजकीय वैमनस्यातून काढला काटा; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 05:33 IST2026-01-04T05:32:27+5:302026-01-04T05:33:41+5:30
राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली.

‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ने केली मंगेश काळोखेंची हत्या; राजकीय वैमनस्यातून काढला काटा; दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग :खोपोली पालिकेचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची कॉन्ट्रॅक्ट किलरने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली असून, एकजण फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली. राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली.
खोपोली नगरपालिका निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे या उर्मिला देवकर यांचा पराभव करून विजयी झाल्या होत्या. देवकर आणि काळोखे या कुटुंबाचे आधीपासूनच वैर होते. या कारणाने पोलिसांनी दोन दिवस चोख बंदोबस्त दोघांच्या घराशेजारी तैनात केला होता. मंगेश यांनी रवींद्र देवकर यांना पूर्वीच मारण्याची धमकी दिली होती. काळोखे यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल होते. पत्नीचा पराभव आणि पूर्वीचे वैर याचा राग मनात ठेवून रवींद्र देवकर यांनी काळोखे यांना मारण्याची सुपारी दिली होती.त्यानंतर २६ डिसेंबरला सकाळी मंगेश यांच्यावर हल्ला करून देवकर यांनी काटा काढला. या प्रकरणी खोपोली पोलिसांनी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्येसाठी तिघांना सुपारी देण्यात आली होती. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, एकाचा शोध सुरू आहे.
एका आरोपीला पुण्यातून अटक
पुणे : काळोखे हत्येप्रकरणातील पसार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली. खालीद खलील कुरेशी (२३) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात खलीलचे नाव समोर आले होते. तपासात खालीद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने काळोखे यांचा दोन मित्रांच्या साथीने खून केल्याची कबुली दिली.