Citizens rushed to seek help from Raigad for flood victims | पूरग्रस्तांसाठी रायगडमधून मदतीचा ओघ, मदतीसाठी नागरिक सरसावले
पूरग्रस्तांसाठी रायगडमधून मदतीचा ओघ, मदतीसाठी नागरिक सरसावले

कर्जत : सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी कर्जतमधील नागरिकांनी मदतीचा हात दिला असून, विविध जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक ट्रक रविवारी जाऊन वस्तू पोच करून आला, यामध्ये पाणी, धान्य, प्रथमोपचार वस्तू, अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता, लवकरच दुसरा ट्रक रवाना करण्यात येणार आहे.
पूरग्रस्तांसाठी तालुक्यातून मदत मिळविण्यासाठी १० आॅगस्ट रोजी कर्जत नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी मेसेज टाकले होते, तसेच सोशल मीडियातून आवाहन करण्यात आले होते, याला कर्जतकरांनी प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हातभार लावून मदत केली. त्यामध्ये कर्जत फोटोग्राफर संघटना, भारतीय जैन संघटना-कर्जत, गुजराती समाज संघटना, बोहरी समाज संघटना, पाटील आळी गणेशोत्सव मंडळ, ओंकार गणेशोत्सव मंडळ, डॉक्टर्स, वकील, मित्र इतर सामाजिक सेवाभावी संस्था, पत्रकार, बजाज फायनान्स कर्जत आणि ग्रुपवरील काही व्यक्तींनी जमेल तशी मदत करून माणुसकीचे दर्शन दिले.
यामध्ये रोख स्वरूपातील आर्थिक मदत, तांदूळ, खाद्यतेल, विविध प्रकारचे कडधान्य, डाळी, साबण, टूथपेस्ट, मेणबत्ती, साड्या, कपडे आणि पाण्याचे बॉक्स या सर्व वस्तू नगरपरिषद कार्यालयात मोठ्या प्रमाणात गोळा झाल्या. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी रामदास कोकरे, सुदाम म्हसे, रमाकांत जाधव, राहुल कुळकर्णी, डॉक्टर प्रेमचंद जैन, प्रदीप गोगटे, प्रशांत उगले, कैलास पोटे आदीनी या सर्व वस्तू बॉक्समध्ये भरून त्या ट्रकमध्ये भरल्या.
११ आॅगस्ट रोजी कर्जत नगरपरिषद कार्यालयातून एक ट्रक सुमारे पाच टन वस्तू घेऊन सांगलीकडे रवाना झाला. ट्रकसोबत कर्जत तालुक्यातील वदप येथील रहिवासी कैलास पोटे व त्यांच्यासोबत सतीश रिकिबे, संदीप मानकामे, ट्रकचालक शशिकांत गंभीर होते. सांगली येथे उभारण्यात आलेल्या मदतकेंद्रात या वस्तू उतरविल्या. त्या ठिकाणी महापौर संगीता खोत, आयुक्त नितीन कापडणीस यांनी आभार मानले.

सुधागडमधील नागरिकांचा हातभार
पाली : कोल्हापूर, सांगली येथे अतिवृष्टी आणि पुराच्या थैमानाने हाहाकार माजला आहे. त्या सर्वांना या संकटाच्या खाईतून वर काढण्याकरिता सुधागड तालुक्यातील नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. यासाठी जे. एन. पालीवाला महाविद्यालयातील एन. एस. एस.च्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य युवराज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेऊन तालुक्यातील नागरिकांनी दिलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा केली असून ती मदत १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर येथे रवाना होणार आहे.
वस्तू स्वरूपात मदत गोळा करण्याकरिता हे विद्यार्थी एकत्र होऊन फिरत होते. अल्पावधीतच गावागावांतून, पाली शहरातून व संपूर्ण तालुक्यातून मदतीचा ओघ वाढतच गेला. तालुक्यातील नागरिकांनी त्यांना शक्य असलेले साहित्य दिले. ते व्यवस्थितरीत्या जमा करण्याचे काम व पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम जे. एन. पालीवाला कॉलेज पाली येथील एनएसएसच्या विद्यार्थी सोनाली लाखीमले, दीपेश जाधव, कुणाल पायगुडे, दीपक बागारे, रुचिता भगत, रेवती चैवाद, जानवी खाडे आदी विद्यार्थी मेहनत घेत करत आहेत.

श्री वीरेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५१ हजारांची मदत
बिरवाडी : महाड आणि पोलादपूर तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये ५१ हजार रुपयांचा धनादेश मंगळवारी देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे व सर्व विश्वस्तांनी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचप्रमाणे देवस्थानचे सरपंच दिलीप पार्टे व त्यांच्या कुटुंबीयांकडून साहाय्यता निधीचा ११ हजारांचा धनादेशही सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये प्रथमच मदत निधी जमा होत असल्याचे महाड महसूल विभागाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त दीपक वारंगे, संजय पवार, हेमंत चांदलेकर, अनंत शेट, माजी नगराध्यक्ष सूर्यकांत शिलीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बिरवाडीकरांचा मदतीचा हात
१बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीमधून पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांनी पुढाकार घेत देव माणसांमध्येच असतो हे आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे. कोल्हापूर व सांगली या भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या भागातील लोकांच्या घरामध्ये पाणीच पाणी झाले आहे. माणसे, गुरे आदी पुरामध्ये वाहून गेले असून तेथील लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, अशा परिस्थितीचा विचार शारदा कॉम्प्लेस कॉ-आॅप-हाउसिंग सोसायटी बिरवाडी येथील सभासदांनी तत्काळ एकत्रित येऊन, काही सभासदांनी तांदूळ ५७५ किलो, डाळ ३० किलो, गोडे तेल १५ किलो, मसाला दोन किलो, कपड्यांचा साबण १०० नग, पिण्याचे पाणी १५ बॉक्स, मेणबत्ती पाच पॅकेट, खोबरेल तेल १०० बॉटल, अंगाचा साबण १०० नग, कपडे साड्या, शर्ट, पॅन्ट व इतर असे १६ गोणी भरून तत्काळ कोल्हापूर व सांगली पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले. महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा येथील डी. के. ग्रुप मित्रमंडळ यांनीही आपल्या मंडळातर्फे पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पाण्याच्या बिस्लरी बॉटलचे बॉक्स पूरग्रस्त नागरिकांकरिता रवाना केल्या असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष दीपक स्वाई यांनी दिली.

माणगावमधून जीवनावश्यक वस्तू
२माणगाव : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विनाशकारी जलप्रलयाने लाखो लोक बेघर झाले आहेत. निसर्गाच्या अवकृपेने पीडित झालेल्या राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत द्या, अशी हाक माणगावकरांच्या कानी आली आणि माणगावतर्फे पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू तसेच रोख रकमेची मागणी तथा आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत एक टेम्पो तांदूळ, बिस्किटे, कपडे, चादरी, टॉवेल तसेच इतर वस्तूंनी भरला. विशेष म्हणजे, अनलिमिटेड फ्रेंडशिप ग्रुप या चिमुकल्या मुलांनी आपल्या खाऊला दिलेल्या पैशांची ९२ रुपये रोख मदत केली, यावरून माणगावकरांचे लहान मुलांवरील संस्काराचे दर्शनही आज घडले. माणगाव ब्राम्हण सभेने केलेल्या मदतीच्या आवाहनाला अत्यंत कमी कालावधीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मदतीतील सर्व सामान व रक्कम घेऊन १२ आॅगस्ट रोजी टेम्पो कोल्हापूर येथे योग्य व गरजू लोकांपर्यंत माणगाव ब्राम्हण सभेचे अध्यक्ष शेखर गोडबोले व सदस्य अमेय भावे, देवेंद्र घैसास, आशिष भाटवडेकर, आशिष जोशी तसेच मुकुल मेहता घेऊन पोहोचले.

पूरग्रस्तांना मदत करण्यात मुस्लीम समाज आघाडीवर

नेरळ : कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुपवरून आवाहन करण्यात आल्यानंतर तालुक्यातील अनेक भागातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा झाली असून, सर्व मदत कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. साधारण १०६ बॅग भरून साहित्य जमा झाले असून, नेरळ आणि कळंब येथील मुस्लीम जमातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली. दरम्यान, प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंची मदत गोळा करून देण्यात आली आहे.
ताटे, ग्लास, चमचे, वाट्या, टॉवेल, बेडशीट, चादरी, ब्लँकेट, धान्य आदी वस्तूंची मदत गोळा करण्यात आली. साधारण १०६ बॅग या साहित्याने भरल्या असून, त्या सर्व बॅग कर्जत तहसील कार्यालयात नेऊन देण्यात आल्या. नेरळ आणि डिकसळमधील कर्जत अपडेटचे सक्रिय कार्यकर्ते यांनी मिळून ती मदत गोळा करण्यात पुढाकार घेतला होता.
नेरळ जामा मशीद ट्रस्ट आणि कळंब मुस्लीम जमात यांनी बकरी ईदनिमित्त मशिदीबाहेर पूरग्रस्त यांच्या मदतीचे केलेले आवाहन यांचे मुस्लीम बांधवांनी जोरदार स्वागत करीत तब्ब्ल ८२ हजार रुपयांची मदत गोळा केली. त्या पैशातून कपडे, भांडी खरेदी, मेडिकल साहित्य खरेदी करण्यात आले. त्या सर्व साहित्याने भरलेल्या बॅग कर्जत तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. मुस्लीम बांधवांनी बकरी ईद असतानाही मुस्लीम बांधव पूरग्रस्त यांच्यासाठी मदत गोळा करीत होते. तसेच दिवसभर गोळा झालेली मदत आपल्या घरी आलेले पाहुणे यांना बाजूला ठेवत सर्व मदत कर्जत अपडेट च्या अन्य सहकारी यांच्यासह कर्जत तहसील येथे पोहोच करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Citizens rushed to seek help from Raigad for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.