बसची डोंगराला धडक; कार दरीत कोसळून मृत्यू; एकाच दिवशी दोन अपघात, बसमधील ५० पर्यटक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:40 IST2026-01-03T14:39:55+5:302026-01-03T14:40:39+5:30
सकाळी झालेल्या या अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी झाले, तर सायंकाळी कार दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

बसची डोंगराला धडक; कार दरीत कोसळून मृत्यू; एकाच दिवशी दोन अपघात, बसमधील ५० पर्यटक जखमी
माणगाव : ताम्हिणी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी दोन भीषण अपघात झाले. रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघालेल्या खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ताम्हिणी घाटातील अवघड वळणावरील डोंगराला बस धडकली. सकाळी झालेल्या या अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी झाले, तर सायंकाळी कार दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पुण्यातील भोसरी येथील सावन आय. बी. ऑटोव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड (शिव महिंद्रा) शोरूममधील कर्मचारी शुक्रवारी दोन खासगी बसमधून रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघाले होते. सकाळी ११ च्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटातील अवघड वळणावर ही बस डोंगराला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली.
ड्रोनच्या मदतीने घेतला अपघातग्रस्त कारचा शोध
कार अपघातात चालक बालाजीचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त गाडीचा चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली.
ड्रोनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यात आला. नोव्हेंबरमध्ये याच ठिकाणी जीप दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा तिथेच अपघात घडला. ताम्हिणी घाटात एक जानेवारीलाही तीन वाहनांचे अपघात झाले होते.