An aquatic animal named Ud attacks young people in the patalganga river | पाताळगंगेत पोहायला जाणाऱ्यांनो, सावधान! उद नावाच्या जलचर प्राण्याचा तरुणांवर हल्ला

पाताळगंगेत पोहायला जाणाऱ्यांनो, सावधान! उद नावाच्या जलचर प्राण्याचा तरुणांवर हल्ला


मोहोपाडा : चांभार्लीतील घोटी परिसरातील पाताळगंगा नदीपात्रात पोहायला गेलेल्या पाच जणांवर ‘उद’या जलचर प्राण्याने हल्ला करून त्यातील तिघांना जखमी केले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निमाण झाले आहे.

चांभार्ली घोटी परिसरातील तलावांजवळ रजत मुंढे, जय म्हात्रे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण दुपारच्या सुमारास गेले होते. तेथे पाताळगंगा नदीपात्रात पोहण्याचा मोह या तरुणांना आवरता आला नाही. यावेळी पाताळगंगा नदिपात्रात पोहत असताना, या तरुणांची नजर पाण्यात बुडणाऱ्या प्राण्यावर पडली. पाण्यात बुडणारे कुत्र्याचे पिल्लू असावे, असा त्यांनी अंदाज बांधला व त्याला वाचविण्याकरिता तिघे पोहत पोहत त्याच्याजवळ पोहोचले. यावेळी रजत मुंढे, जय म्हात्रे आणि सौरभ जांभुळकर या तिघांनी लहान पिल्लू समजून वाचवायला जात असताना, त्या जलचर प्राण्याने तिघांवर हल्ला केला. पाण्यात असतानाच या तरुणांच्या पायाला ठिकठिकाणी चावा घेऊन त्यांना जखमी केले.

मुंगसासारखा  दिसणारा प्राणी -
पाताळगंगा नदिच्या पाण्यातील हा मुंगसासारखा दिसणारा हल्ला करणारा प्राणी कोणता असावा? याबाबत तरुणांनी नदीकाठच्या शेतकऱ्यांना विचारले असता, त्यांनी ‘उद’प्राणी असल्याचे सांगितले. हा मुंगसासारखा दिसणारा प्राणी अचानक हल्ला करतो. हा प्राणी कुठून व कधी आला, याचा अंदाज नाही. तरी पाताळगंगा नदीत पोहायला जाऊ नये, सावधानता बाळगावी, असा इशारा चांभार्ली ग्रामपंचायत उपसरपंच दत्तात्रेय जांभले यांनी दिला आहे.

Web Title: An aquatic animal named Ud attacks young people in the patalganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.