"आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका", अभिनेत्री हेमांगी राव यांची आमदार महेंद्र थोरवेंविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 19:24 IST2025-03-13T19:22:46+5:302025-03-13T19:24:56+5:30
मराठी अभिनेत्री हेमांगी राव यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी माझ्या कुटुंबातील सगळ्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

"आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका", अभिनेत्री हेमांगी राव यांची आमदार महेंद्र थोरवेंविरोधात तक्रार
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, दीपक वाधवान यांच्यावर अभिनेत्री हेमांगी राव यांनी गंभीर आरोप केले आहेत. जमीन लाटण्यासाठी धमकी दिली जात असून, माझ्या कुटुंबातील सर्वांच्या जीवाला धोका आहे. माझ्या सुरक्षारक्षकांच्या जीवालाही धोका असल्याचे हेमांगी राव यांनी म्हटले आहे. हेमांगी राव यांचे आरोप आमदार थोरवे यांनी मात्र फेटाळले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिनेत्री हेमांगी राव यांनी खालापूर पोलीस ठाण्यात आमदार महेंद्र थोरवे, दीपक वाधवान आणि इतरांविरुद्ध तक्रार दिली आहे.
हेमांगी राव यांचा आरोप काय?
पत्रकार परिषदेत अभिनेत्री हेमांगी राव यांनी सांगितले की, "महेंद्र थोरवे, दीपक वाधवान, त्यांना साथ देणारे गुन्हेगार यांच्याविरोधात आम्ही तक्रार केली आहे. ती तक्रार यासंदर्भात केली आहे की, मी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझा नवरा... आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. आमच्या इथे जे सुरक्षारक्षक आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे."
"ही जागा वादग्रस्त आहे. ही जागा वादात टाकावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. यात त्यांना पोलिसांची साथ आहे. आम्हाला न्याय मिळेल अशा कारवाईची अपेक्षा आहे", असा आरोप अभिनेत्री हेमांगी राव यांनी केला आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी आरोप फेटाळले
आमदार महेंद्र थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना हे आरोप फेटाळले आहेत. "खोटी बातमी आहे. दोन महिन्यांपूर्वी राव आणि त्यांच्या पत्नी शुभांगी या माझ्याकडे आल्या आले होते, या जागेसंदर्भात. खालापूरमध्ये आमची जागा आहे आणि आम्हाला ती डेव्हलप करायची आहे, तर तुम्ही आम्हाला मदत करा", असे आमदार थोरवे यांनी सांगितले.
लोकांची फसवणूक करून ९ कोटी जमा केले
"त्या जागेचा तपशील घेतला असता, आमच्या निदर्शनास असं आलं की, काही वर्षापूर्वी राव आणि अभिनेत्री हेमांगी यांच्या नावाची एक कंपनी आहे. कंपनीच्या नावावर त्यांनी लोकांना फ्लॅट बांधून देतो, बंगले बांधून देतो, असे सांगून कमीत कमी ९ कोटी रुपये सर्वसामान्य लोकांकडून फसवणूक करून घेतलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी फ्लॅट, बंगलो काहीच बांधून दिलेले नाहीत", असे थोरवे यांनी सांगितले.
"या सगळ्या लोकांनी ग्राहक तक्रार न्यायालयात, आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर राव आणि अभिनेत्री हेमांगी यांनी ही जागा ११ कोटी रुपयांना बिल्डर दीपक वाधवान यांना करार करून विकली. त्याच्यामध्ये काही अटीशर्थी होत्या. कागदपत्रे नीट करू द्यायची होती. पण राव आणि हेमांगी यांनी ते करून दिले नाही. दीपक वाधवान यांच्याकडून त्यांनी दोन कोटी ९० लाख उचलले. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, तुम्ही लोकांची फसवणूक करत आहात, त्यामुळे मी तुम्हाला पाठबळ देऊ शकत नाही. दीपक वाधवान चुकीचे नाहीत", असे महेंद्र थोरवे यांनी सांगितले.