कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघात; तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:35 IST2020-02-07T23:34:57+5:302020-02-07T23:35:48+5:30

कारचा चक्काचूर; नेरळ पोलीस ठाण्यात नोंद

Accident on Karjat-Kalyan state highway; The death of a young man | कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघात; तरुणाचा मृत्यू

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघात; तरुणाचा मृत्यू

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळजवळील आंबिवली गावाजवळ इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला. यात गाडीचा पूर्ण चक्काचूर होऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. चेतन सदानंद अहिर (२७) असे या युवकाचे नाव असून, तो नेरळजवळील आंबिवली येथे राहणारा आहे.

आपल्या मित्राला दवाखान्यात घेऊन जातो, असे सांगून चेतन ६ फेब्रुवारी रोजी घराबाहेर पडला होता. त्याच वेळी दुसऱ्या दिवशी आपल्या चुलत भावाचा साखरपुडा असल्याने घरातील लहान गाडी अपुरी पडेल, या विचाराने तो मित्राची एर्टिगा गाडी क्र. एमएच ४६ पी ७७८१ ही घेऊन रात्री घरच्या दिशेने निघाला. मात्र, घराच्या दोन किलोमीटर अगोदर कल्याण-कर्जत राज्यमार्गावर माणगावजवळील इस्सार पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला.

गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली, त्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला होता. गुरुवारी रात्री घडलेल्या या अपघाताची माहिती शुक्रवारी सकाळी मिळाली त्यामुळे वेळेवर मदत न मिळाल्याने चेतनचा मृत्यू झाला, असे समजते. मात्र, हा अपघात कसा झाला. चेतनच्या गाडीला कोणी धडक दिली की, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले, हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेची नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू.

Web Title: Accident on Karjat-Kalyan state highway; The death of a young man