ZP Election 2026 :छोटी हाईट मोठी फाईट...! निकिता ठरली प्रेरणादायी मतदार; पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:01 IST2026-02-07T13:56:04+5:302026-02-07T14:01:29+5:30
- शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेली एक प्रेरणादायी घटना चर्चेचा विषय ठरली.

ZP Election 2026 :छोटी हाईट मोठी फाईट...! निकिता ठरली प्रेरणादायी मतदार; पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
पुणे: राज्यभर सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या दोन तासांत सरासरी 7.74 टक्के मतदान नोंदवले गेले. विशेषतः ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर नागरिकांनी सकाळीच रांगा लावून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला.
या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेली एक प्रेरणादायी घटना चर्चेचा विषय ठरली. निकिता मनीष गडिया (वय 21) हिने आज प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. केवळ दोन फूट उंची असलेल्या निकिता या मतदान करणाऱ्या सर्वात कमी उंचीच्या तरुण मतदारांपैकी एक ठरल्या आहेत.
निकिता ठरली प्रेरणादायी मतदार;पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क#ZPElection2026#pune#Maharashtrapic.twitter.com/0pj3HyGueK
— Lokmat (@lokmat) February 7, 2026
शारीरिक मर्यादा असल्या तरी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याची त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट उंचावत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांचे कुटुंबीयही सोबत होते.
मतदान केंद्रावरील अधिकारी आणि नागरिकांनी निकिताच्या आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले. “लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते,” याचा प्रत्यय देणारे हे दृश्य कोरेगाव भीमामध्ये पाहायला मिळाले.
दरम्यान, निकिता गडिया मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकांकडून त्यांच्या धैर्याचे आणि सकारात्मकतेचे कौतुक होत आहे. निवडणुकीच्या वातावरणात मतदारांना मतदानासाठी प्रेरित करणारी ही घटना ठरत आहे.