ZP Election 2026: 'प्रथम मतदान, नंतर लग्न', विवाहाच्या उंबरठ्यावरही लोकशाहीचे कर्तव्य; दौंडच्या युवकाचा मतदानातून आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:21 IST2026-02-07T15:20:37+5:302026-02-07T15:21:23+5:30
ZP Election 2026 “लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मतदान महत्त्वाचे आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा देशासाठीचे कर्तव्य मोठे आहे,” अशी भावना तरुणाने व्यक्त केली

ZP Election 2026: 'प्रथम मतदान, नंतर लग्न', विवाहाच्या उंबरठ्यावरही लोकशाहीचे कर्तव्य; दौंडच्या युवकाचा मतदानातून आदर्श
केडगाव (ता. दौंड) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील हंडाळवाडी बूथवर एक प्रेरणादायी घटना घडली. विवाहाच्या गडबडीत असतानाही “प्रथम मतदान, नंतर लग्न” हा संदेश देत अभिजीत मारुती टेंगले या युवकाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाहीप्रती आपली निष्ठा दाखवली.
अभिजीत टेंगले हे उच्चशिक्षित युवक असून त्यांनी एम.ए.पर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षणासोबतच ते शेती व्यवसाय सांभाळत असून ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. विवाहाचा उत्साह, नातेवाईकांची लगबग आणि तयारी असतानाही त्यांनी नागरिक म्हणून आपले कर्तव्य प्रथम मानले.
अभिजीत टेंगले यांचा विवाह दिनांक ७ रोजी यवत येथील गणेश मंगल कार्यालयात संपन्न होणार असून नवरी काजल रमेश बरकडे या सहजपूर (ता. दौंड) येथील आहेत. विवाहापूर्वी हंडाळवाडी बूथवर जाऊन त्यांनी मतदान केले. नवरदेवाने मतदानासाठी दाखविलेला हा उत्साह पाहून उपस्थित मतदार, निवडणूक कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
“लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मतदान महत्त्वाचे आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा देशासाठीचे कर्तव्य मोठे आहे,” अशी भावना अभिजीत टेंगले यांनी व्यक्त केली. त्यांच्या या कृतीमुळे परिसरातील युवकांमध्ये मतदानाबाबत सकारात्मक संदेश गेला असून, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. विवेक गरदडे, अजित हंडाळ, गणेश टेंगले, गणेश मेमाणे, अभिषेक हंडाळ योगेश बोरकर, प्रमोद टेंगले, सुमित श्रीराम आधी मित्रमंडळींनी त्यांना मतदान करण्यासाठी नवरदेवाला प्रोत्साहन दिले.या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमामुळे केडगाव व परिसरात अभिजीत टेंगले यांचे सर्वत्र कौतुक होत असून, ‘मतदान हीच खरी लोकशाहीची शपथ’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.