ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सरासरी सुमारे ६८.८९ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 11:08 IST2026-02-08T11:08:07+5:302026-02-08T11:08:37+5:30

७३ गट, १४६ गणांसाठी शांततेत प्रक्रिया; निकाल सोमवारी

ZP Election 2026 :An average of 68.89 percent voting in the district for Zilla Parishad and Panchayat Samiti took place peacefully for 73 groups and 146 ganas; Results on Monday | ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सरासरी सुमारे ६८.८९ टक्के मतदान

ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सरासरी सुमारे ६८.८९ टक्के मतदान

पुणे :पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी शनिवारी ३ हजार ६०५ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ६८.८९ टक्के मतदान झाले असून, या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी २९९ व पंचायत समितीसाठी ५२८ असे एकूण ८२७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. ९) जाहीर होणार आहे.

बदललेल्या राजकीय युती, वाढलेली अपक्ष उमेदवारांची संख्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्हा शोकसागरात असतानाच ही निवडणूक पार पडली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांनी जाहीर प्रचार टाळला. सभा, रॅली न घेता केवळ कोपरा सभा, वैयक्तिक भेटी आणि पत्रकांपुरताच प्रचार मर्यादित ठेवण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक तुलनेने शांत वातावरणात पार पडल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये किरकोळ बिघाड झाला, तर शिरूर व हवेली तालुक्यात शाब्दिक चकमकी व झटापटीच्या घटना घडल्याचे समोर आले. मात्र, एकूणच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात प्रशासनाला यश आले. सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर ‘मॉक पोल’ घेऊनच मतदानास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टप्प्याटप्प्याने मतदानाचा आलेख

पहिल्या दोन तासांत म्हणजे साडेनऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७.७४ टक्के मतदान झाले. या काळात मावळ, भोर आणि आंबेगाव तालुक्यांत मतदारांचा उत्साह दिसून आला. साडेअकरा वाजेपर्यंत मतदान २१.१६ टक्क्यांवर पोहोचले. दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३६.६७ टक्के मतदान झाले असून, त्यात मावळ तालुका (४२.११ टक्के) आघाडीवर होता. दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत मतदानाचा वेग वाढला आणि साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५१ टक्के मतदान नोंदवले गेले.

तालुकानिहाय अंतिम मतदान टक्केवारी :

जुन्नर ६१.१८ टक्के, आंबेगाव ६५.३० टक्के, शिरूर ७५.५९ टक्के, खेड ७५.४६ टक्के, मावळ ७७.४३ टक्के, मुळशी ६३.७९ टक्के, हवेली ६८.०२ टक्के, दौंड ६५ टक्के, पुरंदर ६८.३७ टक्के, राजगड ७९.३० टक्के, भोर ७५.६२ टक्के, बारामती ५४.९० टक्के आणि इंदापूर ६५.६७ टक्के. एकूणच बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : पुणे ZP चुनाव 2026: 68.89% मतदान दर्ज

Web Summary : पुणे जिला परिषद चुनावों में 73 समूहों और 146 उपसमूहों में 68.89% मतदान हुआ। हाल की घटनाओं के कारण कम प्रचार के बावजूद, मामूली घटनाओं के साथ मतदान शांतिपूर्ण रहा। परिणाम सोमवार को घोषित किए जाएंगे।

Web Title : Pune ZP Election 2026: 68.89% Voter Turnout Recorded

Web Summary : Pune Zilla Parishad elections saw 68.89% voter turnout across 73 groups and 146 subgroups. Despite a low-key campaign due to recent events, polling remained peaceful with minor incidents. Results will be announced on Monday.