निवडणूक काळात धारदार हत्यारांसह तरुण जेरबंद; बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:52 IST2026-02-04T15:51:15+5:302026-02-04T15:52:46+5:30

ही कारवाई संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रुई ब्रीज परिसरात करण्यात आली.

Zilla Parishad Election Youth arrested with sharp weapons during election period; Baramati taluka police take strong action | निवडणूक काळात धारदार हत्यारांसह तरुण जेरबंद; बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई

निवडणूक काळात धारदार हत्यारांसह तरुण जेरबंद; बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई

बारामती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात बारामती तालुका पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला तलवार व कोयत्यासारखी धारदार हत्यारे बाळगताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रुई ब्रीज परिसरात करण्यात आली.

सोमवारी (दि. २) बारामती तालुका पोलिस निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू असताना एका बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. एका दुचाकीवरून एक इसम तलवार व कोयता बाळगून एमआयडीसीकडून भवानी नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला. रुई ब्रीजखाली संशयित दुचाकी अडवून तपास केला असता ओंकार रामचंद्र काळे (वय १९, रा. सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे), असे आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्याच्या दुचाकीच्या डाव्या बाजूला असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून दोन लोखंडी तलवारी व एक धारदार कोयता मिळून आला.

पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी झडती घेऊन ही सर्व हत्यारे तसेच दुचाकी जप्त केली. यात दुचाकी (एमएच ४२ बीजी ७३७७) अंदाजे किंमत ३० हजार रुपये, पितळी मूठ असलेली तलवार (६७ सेमी) अंदाजे किंमत १,५०० रुपये, लोखंडी तलवार (४५ सेमी) अंदाजे किंमत ५०० रुपये, लोखंडी धारदार कोयता अंदाजे किंमत ३०० रुपये एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ३२,३०० रुपये इतकी आहे. बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगल्याप्रकरणी आरोपी ओंकार काळे याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलिस अंमलदार सुरेंद्र वाघ, मनोज पवार, अवधूत शिंदे, भारत खारतोडे दादा दराडे यांनी केली.

Web Title: Zilla Parishad Election Youth arrested with sharp weapons during election period; Baramati taluka police take strong action