Zilla Parishad Election : तिकिटांचा गोंधळ, पक्षनिष्ठा वाऱ्यावर; शेवटच्या दिवशी राजकीय धावपळ शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:04 IST2026-01-22T14:04:03+5:302026-01-22T14:04:24+5:30
एकीकडे युतींमुळे आधीच नाराज झालेल्या इच्छुकांनी पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडत उमेदवारी मिळेल त्या पक्षात प्रवेश केला.

Zilla Parishad Election : तिकिटांचा गोंधळ, पक्षनिष्ठा वाऱ्यावर; शेवटच्या दिवशी राजकीय धावपळ शिगेला
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. २१) तिकिटांचा गोंधळ पाहायला मिळाला. एकीकडे युतींमुळे आधीच नाराज झालेल्या इच्छुकांनी पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडत उमेदवारी मिळेल त्या पक्षात प्रवेश केला. तर काही ठिकाणी भाजप-शिंदेसेना, घड्याळ-तुतारी आमने-सामने पहायला मिळाली. दरम्यान, सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर युती धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पदाधिकाऱ्यांना ते न रुचल्याने भाजपकडून काहींना उमेदवारी देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या गोंधळामुळे कोणाला उमेदवारी मिळाली आणि कोणाचा पत्ता कट झाला याचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.
महापालिका निवडणुकीत आलेले अनुभव लक्षात घेता सर्वच पक्षांनी अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचे टाळले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही जणांना एबी फॉर्म मिळाले तर काहींना थेट अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधीच एबी फॉर्म दिले गेल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिरुरमध्ये इच्छुक उमेदवार, समर्थक व कार्यकर्त्यांची अचानक झालेली गर्दी, धक्काबुक्की आणि गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही तालुक्यांमध्ये एबी फॉर्मच्या उशिरा मिळालेल्या निर्णयांमुळे आणि शेवटच्या क्षणी झालेल्या पक्षांतरांमुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येत्या निवडणुकीची खरी लढत आता रंगात आली आहे.
.......................................................
मुळशीत घड्याळ-तुतारी आमने-सामने
जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन झाले असून आंबेगाव वगळता सर्वच ठिकाणी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जाणार असे बोलले जात होते. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी यामध्ये मोठे बदल पहायला मिळाले. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला एकही जागा दिली नाही. याउलट भाजपबरोबर युती धर्म पाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मुुळशीतही उमेदवारीवरून घड्याळ-तुतारी आमने-सामने आले आहेत. या ठिकाणी दोन्ही गटांनी इच्छुकांना पक्षाचे एबी फॅार्म दिले.
..........................................
भाजप-शिंदेसेनेची युती तुटली
पुरंदरमध्ये भाजप आणि शिंदे गटामधील युती तुटली आहे. शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ लोळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर अनेक तालुक्यांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात पक्ष बदल करून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय गोंधळ बघायला मिळाला. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असूनदेखील कोणत्याही राजकीय पक्षाने रात्री उशिरापर्यंत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नव्हती.
इंदापूरचे गणित जुळले
इंदापूर तालुक्यामध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या तिघांचे गणित जुळण्यात यश मिळाले. त्यामुळे केवळ इंदापूरमध्ये मनोमिलन यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे यांना गणातून तर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे, आप्पासाहेब जगदाळे यांचे सुपुत्र यशराज जगदाळे यांना गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.