बारामती : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिंदेसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात थेट उमेदवार उभे केल्याने नगरपरिषदेपाठोपाठ या निवडणुकीतही महायुतीत अंतर्गत संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार)ने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे अनेक प्रबळ इच्छुकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे, बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्र लढण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी जाहीर झालेल्या यादीत राष्ट्रवादी (शरद पवार)च्या एकाही उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) मध्ये असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप कार्यकर्ते व जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभिजीत देवकाते पाटील यांच्या पत्नी शिवानी अभिजीत देवकाते पाटील यांना निरावागज जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी (अजित पवार)ची उमेदवारी दिली आहे. मात्र, पंचायत समितीसाठी सुपा आणि शिर्सुफळ गणांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार)कडून उमेदवार देण्यात आलेले नाहीत. दुसरीकडे भाजपने सुपा, शिर्सुफळसह एकूण ११ ठिकाणी उमेदवार जाहीर करून ताकद दाखवली आहे. सुपा, कार्हाटी, पणदरे आणि वडगाव निंबाळकर गटांत सहा, तर निंबुत गट ‘अ’ मध्ये एक उमेदवार दिला आहे.
शिंदेसेनेने चार जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांमध्ये उमेदवार दिल्याचा दावा केला असला, तरी अद्याप त्यांची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे भाजपसाठी जिल्हा परिषदेत एक आणि पंचायत समितीमध्ये दोन जागा सोडून महायुती धर्म निभावण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे.
याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार)च्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. भाजपनेही अनेक ठिकाणी थेट उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे महायुतीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, २७ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच बारामतीतील राजकीय लढतीचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) नाराज
दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार)चे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, ‘बैठकीत आम्हाला जागा देण्याचे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात एकही जागा मिळालेली नाही. एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याने वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.’
Web Summary : Baramati's Zilla Parishad election sees Mahayuti allies BJP and Shinde Sena challenging NCP, hinting at internal conflict. NCP (Sharad Pawar) faces discontent as candidates aren't included. Clarity awaits withdrawal deadline.
Web Summary : बारामती जिला परिषद चुनाव में महायुति के सहयोगी भाजपा और शिंदे सेना ने एनसीपी को चुनौती दी, जिससे आंतरिक कलह का संकेत मिलता है। एनसीपी (शरद पवार) को असंतोष का सामना करना पड़ रहा है क्योंकि उम्मीदवारों को शामिल नहीं किया गया है। नाम वापसी की अंतिम तिथि का इंतजार है।