Zilla Parishad Election : मावळ तालुक्यात भाजपमध्ये रंगणार अटीतटीचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:21 IST2026-01-22T14:21:35+5:302026-01-22T14:21:52+5:30
मावळ तालुक्यात जि.प. गटासाठी २७, पंचायत समिती गणासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल

Zilla Parishad Election : मावळ तालुक्यात भाजपमध्ये रंगणार अटीतटीचा सामना
वडगाव मावळ : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटासाठी २७, तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी ५२ अर्ज दाखल झाले. माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी ही माहिती दिली. अर्ज दाखल करताना पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनदेखील केले. या सर्वच गटांत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खडाजंगी रंगणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या टाकवे- नाणे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गटात ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. खरी लढत भाजप व राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार) होणार आहे आहे. इंदुरी- वराळे सर्वसाधारण महिला आरक्षित असून या गटात ४ अर्ज दाखल झाले आहेत. येथे मुख्य लढत भाजप व राष्ट्रवादी पक्षात आहे. कार्ला खटकाळे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून गटात ४ उमेदवारांनी अर्ज केले दाखल असून लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जंगी सामना रंगू शकतो.
कुसगाव- काले सर्वसाधारण गटासाठी राखीव असून या गटात ७ अर्ज दाखल झाले आहेत, तर सोमाटणे-चांदखेड सर्वसाधारण महिला राखीव असून या गटात ६ अर्ज दाखल झाले आहेत. येथे अटीतटीची लढत ही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये असेल.
वराळे व सोमाटणे गणात सर्वाधिक अर्ज दाखल
पंचायत समितीच्या गणासाठी वराळे व सोमाटणे गणामध्ये सर्वाधिक ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नाणे व चांदखेड गणात प्रत्येकी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. टाकवे बुद्रुक गणात ४, नाणे गणात ३, वराळे गणात ८, इंदुरी गणात ६, खटकाळे गणात ५, कार्ला गणात ५, कुसगाव बुद्रुक गणात ५, काले गणात ५, सोमाटणे गणात ८, चांदखेड गणात ३, असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.