Z P School : निधीअभावी झेडपी शाळांत सीसीटीव्हीचे काम रखडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:00 IST2025-02-20T17:58:38+5:302025-02-20T18:00:04+5:30
- भोर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Z P School : निधीअभावी झेडपी शाळांत सीसीटीव्हीचे काम रखडले
भोर : निधी नसल्याने जिल्हा परिषदेच्या भोर तालुक्यातील २६८ आणि वेल्हे तालुक्यातील १४१ प्राथमिक शाळांमध्ये 'सीसीटीव्ही कॅमेरे' बसवण्याचे काम रखडल्याचे आढळले आहे. मात्र दोन्ही तालुक्यांतील सर्व शाळांमधून विद्यार्थी सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली.
भोरमधील ६५ व वेल्ह्यातील ११ खासगी कॉलेज, हायस्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून विद्यार्थी सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. भोर तालुक्यात चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये सुमारे २६ हजार विद्यार्थी संख्या आहे. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींची सुरक्षा संबंधित शिक्षण विभाग संस्थेच्या स्थानिक पातळीवर असते. एखादी घटना घडल्यानंतर सरकार त्यासंबंधी सुधारणा व उपाययोजनांबाबत आदेश काढते मात्र त्याची अंमलबजावणी झाली की नाही. याबाबत फारसे गांभीर्य आढळत नाही.
मागील वर्षी मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी शाळांमधील अल्पवयीन मुलींवर झालेले अत्याचार व अनुचित प्रकारानंतर तीव्र संतापाची लाट आली होती. या घटनानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे धोरण आहे. सरकारने ऑगस्ट २०२४ च्या सरकारी निर्णयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत ठोस उपाययोजना सुचवल्या. त्यानुसार शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे ठरले.
दरम्यान केवळ सीसीटीव्ही बसवणे पुरेसे नसून, ठरावीक अंतराने त्याचे फुटेज तपासणे, काही आक्षेपार्ह बाब आढळल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवली आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेत 'कंट्रोल रूम' करावी, आक्षेपार्ह बाब आढळल्यास पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खर्चासाठी 'जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना डीपीसी' अंतर्गत शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र निधीची तरतूद झाली नसल्याने प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही बसवले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. बहुतेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी संबंधित ग्रामपंचायतीला सीसीटीव्ही बसवण्याबाबत पत्रे दिली आहेत.
'विद्यार्थी सुरक्षा' समितीची नव्याने स्थापना
प्राथमिक शाळांमधून तक्रार पेटी बसवण्यात आल्या आहेत. काही तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी त्यात ती नोंदवायची आहे. शिक्षक, मुख्याध्यापक या पेटीची नियमित तपासणी करतात. सध्या बहुतांश ठिकाणी शालेय व्यवस्थापन, शिक्षक व पालक, शालेय परिवहन, शालेय पोषण आहार,शाळा सुरक्षा,माता पालक, सखी सावित्री समिती आदी समित्या कार्यरत आहेत. सखी सावित्री समितीमध्ये सुचवलेल्या तरतुदींचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना नव्याने दिल्या आहेत विशेषतः विद्यार्थ्यांबाबत लैंगिक छळाचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळतात. अशा घटनांचा विपरीत परिणाम संबंधित विद्यार्थी त्याचे कुटुंबीय व समाजावर होतो. त्या प्रकारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक शाळेत 'विद्यार्थी सुरक्षा' समिती नव्याने स्थापन केल्या आहेत.
भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अनेक मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतीकडे शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देण्याची मागणी केली आहे.निधी उपलब्ध होताच वरिष्ठ पातळीवरून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही होईल. - राजकुमार बामणे (गटशिक्षणाधिकारी)