दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 11:55 IST2025-06-29T11:54:39+5:302025-06-29T11:55:00+5:30

- दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे.

Youth kidnapped and murdered for Rs 2,000; Two get life imprisonment | दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप

दोन हजार रुपयांसाठी अपहरण करून तरुणाचा खून; दोघांना जन्मठेप

पुणे : रस्त्यावरून जात असताना दुचाकीला आडवा आल्याने दुचाकीचे नुकसान झाल्याचा बहाणा करून तरुणाचे अपहरण करीत नातेवाइकांकडे दोन हजारांची मागणी करूनही पैसे न दिल्याने तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेसह सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात तब्बल ४० जणांची साक्ष नोंदविण्यात आली.

सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा निकाल दिला. सुमित ऊर्फ सोन्या सुधीर काळे व अक्षय ऊर्फ भीमा बाळू दिवटे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही नमूद केले आहे. ही घटना १८ मार्च २०१७ रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली.

रामअवतार बनवारीलाल जाटव (वय १९) असे मृत युवकाचे नाव आहे. मूळचा मध्य प्रदेशचा असलेला जाटव पुण्यात बांधकाम ठिकाणी फरशी बसविण्याचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी आरोपी त्यांच्या दुचाकीवरून मार्केटयार्ड येथे जात होते. यावेळी रामअवतार हा रस्त्यात आडवा आल्याने दोन्ही आरोपी रस्त्यावर खाली पडले. याबाबत त्यांनी रामअवतारकडे नुकसान भरपाईची मागणी केली. यादरम्यान, त्यांनी त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून वनशिव वस्ती येथील मोकळ्या जागेत नेत त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधत रामअवतार याला सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्याच्या कारणावरून त्यांनी संगनमत करत रामअवतार याचा दोरीने गळा आवळून व त्याच्या डोक्यात दगड घालून खून करत दोघे पसार झाले होते.

याप्रकरणी, पोलिसांनी आरोपींना अटक करत त्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी कामकाज पाहिले. युक्तिवादादरम्यान, त्यांनी व्हॉइस सॅम्पल, मोबाइल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे कोर्टापुढे सादर केले. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत शिक्षा सुनावली. सरकार पक्षास न्यायालयीन कामकाजास हवालदार गणेश तेळकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Youth kidnapped and murdered for Rs 2,000; Two get life imprisonment