छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 18:47 IST2025-07-31T18:46:59+5:302025-07-31T18:47:17+5:30
विटंबना केल्यानंतर आरोपी उसाच्या शेतात लपून बसला असून ऊस खाऊन आणि घोड्यांना दिलं जाणारं पाणी पिऊन ५ दिवस काढले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला अटक
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. उसाच्या शेतात लपून बसलेल्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने ऊस खाऊन आणि घोड्यांना दिलं जाणारं पाणी पिऊन ५ दिवस काढले असल्याची माहिती समोर आली आहे. अमित उर्फ अमीन पापा सय्यद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना २७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पुणे जिल्ह्यातील यवत तालुक्यात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नीलकंठेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर असलेला एक प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुतळा आहे. २७ जुलै रोजी आरोपीने याठिकाणी प्रवेश करत या पुतळ्याचे नुकसान केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी यवत पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकं तयार केले होते. तपासादरम्यान ३१ जुलै रोजी संबंधित आरोपी हा यवत मधील एका उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन या व्यक्तीला ताब्यात घेतले असता त्यानेच हे कृत्य केलं असल्याची कबुली दिली. अधिक तपास यवत पोलिसांकडून सुरू आहे.