तुमचे हक्क काढून घेतले आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:27 IST2025-08-11T12:27:32+5:302025-08-11T12:27:41+5:30
माहितीच्या अधिकारात माहिती मागवा, पण तुम्हाला कागद दिला जात नाही अशी परिस्थिती केली आहे

तुमचे हक्क काढून घेतले आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे - बाळासाहेब थोरात
पुणे: समाज संवेदनशील असला पाहिजे. तुमचे हक्क काढून घेतले आहेत. त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. माजी नगरसेवक धनंजय थोरात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ अशोक देशमाने आणि जुगल राठी यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, संपादक पराग करंदीकर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, शास्त्रीय संगीतात जात, भेद नाही. कुणी कुणाचाही गुरू होऊ शकतो. जे शुद्ध असते ते भेद निर्माण करत नाही. माहिती अधिकार कायदा आणण्यासाठी आम्हीही होतो. माहितीच्या अधिकारात माहिती मागवा; पण तुम्हाला कागद दिला जात नाही अशी परिस्थिती केली आहे. तुमचे हक्क काढून घेतले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डिजिटल स्वरूपात मतदार मागवल्या; पण दिल्या नाहीत. ४५ दिवसांत सर्व नष्ट करून टाकायचा निर्णय घाईगडबडीत घेतला. इतिहासात हा कालखंड देशाचा घातक असेल. पण वाचवणारे आहेत आपण देश वाचवणारे व्हायचे आहे. कायदे तेच असतात, वापरणारे कसे आहेत त्यावर त्याचे यश अवलंबून असते. प्रगत राज्य हे शब्द वापरायचे पण शेतकरी आत्महत्या होते हे योग्य नाही.
अशोक देशमाने म्हणाले, आयटीमधील नोकरी सोडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्नेहवन सुरू केले. दोनशे मुलांच्या निवासाची व्यवस्था उभी राहिली. जुगल राठी यांनी मनोगत व्यक्त केले. शास्त्रीय गायक रघुनंदन पणशीकर यांना हा पुरस्कार देण्यात येत होता; पण ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्या मुलाने स्वीकारला पराग करंदीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मोहन जोशी यांनी मानले.