तुमची पत्रकार परिषद सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी...! फलटणच्या डॉक्टर तरुणीवरून चाकणकर या पुन्हा ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:24 IST2025-10-29T11:23:01+5:302025-10-29T11:24:01+5:30
कोणाला तरी चांगले वाटावे, म्हणून बोलणे योग्य नाही. कायद्याच्या चौकटीतच काम करणे आणि बोलणे गरजेचे आहे, ते मी केले

तुमची पत्रकार परिषद सत्ताधाऱ्यांना वाचवण्यासाठी...! फलटणच्या डॉक्टर तरुणीवरून चाकणकर या पुन्हा ट्रोल
पुणे : बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावेळी नेटिझन्सच्या संतापाला सामोरे जावे लागलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर पुन्हा एकदा नेटिझन्सच्या रडारवर आल्या आहेत. फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चाकणकर यांनी केलेल्या खुलाशावरून त्या सध्या ट्रोल होत आहेत. अनेकांनी समाज माध्यमावर चाकणकर यांची पत्रकार परिषद माजी खासदारांना वाचवण्यासाठी होती, असा आरोप करत थेट त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून त्या सत्ताधारी गटात गेल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर या ना त्या कारणाने चाकणकर नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची सून असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणावेळीही चाकणकर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्या.
हगवणे प्रकरणानंतर काहीशा बॅकफूटवर गेलेल्या चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. फलटण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणामध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक यांच्यावर आरोप होत असताना, चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने फलटण येथे जाऊन या प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मृत महिला डॉक्टर व आरोपी यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. या खुलाशांवरून चाकणकर यांची पत्रकार परिषद पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी नाही, तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना वाचवण्यासाठी होती. महिला आयोग महिलांसाठी नाही तर नेत्यांना वाचवण्यासाठी काम करत आहे, असे म्हणत अनेकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मागितला आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टर तरुणीचे मोबाइल चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगची माहिती माध्यमांसमोर देऊन मृत तरुणीचे चरित्र्यहनन करणे निंदनीय आहे. मृत डॉक्टरांच्या बदनामीला चाकणकरच जबाबदार असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.
फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येनंतर सर्वप्रथम मी पोलिसांना सूचना केल्या. गेल्या चार दिवसात पोलिसांच्या तपासामध्ये, फॉरेन्सीक अहवालामध्ये ज्या बाबी समोर आल्या, त्या मी मांडल्या. कोणाला तरी चांगले वाटावे, म्हणून बोलणे योग्य नाही. कायद्याच्या चौकटीतच काम करणे आणि बोलणे गरजेचे आहे, ते मी केले. टीका करणे विरोधकांचे कामच आहे. - रुपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग