बुलेटची धडक बसल्याने शेजारून जाणाऱ्या पीएमपीखाली तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 13:26 IST2022-04-19T13:24:39+5:302022-04-19T13:26:39+5:30
शनिवारवाड्याजवळ शिवाजी रस्त्यावरील घटना...

बुलेटची धडक बसल्याने शेजारून जाणाऱ्या पीएमपीखाली तरुणीचा मृत्यू
पुणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पायी जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक बसली. या धडकेत २५ वर्षीय तरुणी शेजारून जाणाऱ्या पीएमपी बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शनिवारवाड्याजवळ शिवाजी रस्त्यावर घडली.
शीतल बाळासाहेब पवार (वय २५ रा. मूळ इंदापूर, सध्या हडपसर) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत चेतन कोकरे (२५, रा. मूळ बारामती, सध्या हडपसर) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी इम्रान इजाज शेख (२२, रा. गणेश पेठ) या बुलेट चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल ही मित्र चेतन सोबत रविवारी शनिवारवाडा आणि आसपासचा परिसर फिरण्यासाठी आली होती. शनिवारवाडा पाहिल्यानंतर ती मित्रासोबत कसबा गणपती मंदिराकडे जायला निघाली. मात्र, रस्ता ओलांडताना शिवाजीनगरहून बुलेटवरून भरधाव वेगाने येणाऱ्या आरोपीचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याच्या गाडीची जोरदार धडक शीतलसह मित्राला बसली. त्यात तिचा मित्र एका बाजूला पडला, तर शीतल चिंचवडहून कात्रजला निघालेल्या पीएमपीच्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडली. बसचे चाक तिच्या पोटावरून गेले. उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, तिचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे तपास करत आहेत.
शीतल ही मूळची इंदापूरची आहे. हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आई-वडिलांपासून दूर एकटीच पुण्यात आली होती. रविवारी शनिवारवाडा पाहण्यासाठी ती मित्रासह बाहेर पडली अन् तिच्यावर काळाने घाला घातला.