Pune Crime | पुण्यात गुंडांचा तरुणावर जीवघेणा हल्ला; कोंढव्यातील साईनगर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 12:45 IST2023-03-30T12:44:15+5:302023-03-30T12:45:51+5:30
माने याच्यावर २०२१ मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केली होती...

Pune Crime | पुण्यात गुंडांचा तरुणावर जीवघेणा हल्ला; कोंढव्यातील साईनगर परिसरातील घटना
पुणे : भांडणे असलेल्या तरुणाबरोबर फिरत असल्याच्या रागातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रोहित खंडाळे (वय २१, रा. कोंढवा ब्रुद्रक) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी पवन रवींद्र राठोड (वय २३, रा. साईनगर, कोंढवा) याला अटक केली आहे. मंगेश अनिल माने (वय २५, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. ही घटना कोंढव्यातील साईनगर येथे सोमवारी रात्री दहा वाजता घडली. मंगेश माने याच्यावर २०२१ मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यातून त्याची २२ नोव्हेंबर रोजी जामिनावर सुटका झाली आहे.
अधिक माहितीनुसार, रोहित हा त्याचा मित्र वैभव साळवे याच्यासोबत फिरत होता. काही दिवसांपूर्वी मंगेशची वैभवसोबत भांडणे झाली होती. त्याच रागातून टोळक्याने २७ मार्चला रात्री दहाच्या सुमारास रोहितला गाठले. दुश्मनांसाेबत का फिरतोस, अशी विचारणा करीत त्याच्या दोन्ही हातावर आणि डोक्यात कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यावेळी रोहितला मदतीसाठी आलेल्या नागरिकांना टोळक्याने कोयते दाखवून दहशत माजविली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संदीप भोसले तपास करीत आहेत.