धायरीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:38 IST2020-07-28T17:38:08+5:302020-07-28T17:38:54+5:30
हॉलमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास.

धायरीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप स्पष्ट
पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात २२ वर्षीय तरुणीने घरामधे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडीस आला.
कोमल महादेव बांदल (वय: २२ वर्षे, रा. शौर्य व्हीला, पोकळे वस्ती, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलचे शिक्षण बारावी झाली असून ती सध्या आईला घरकामात मदत करत असे. तिचे वडील व भाऊ खासगी कंपनीत कामास आहेत. मंगळवारी सकाळी भाऊ व वडील कामाला गेले होते. तर तिची आई सकाळी अकराच्या दरम्यान दवाखान्यात गेली होती. त्यावेळी कोमल एकटी घरी होती. दुपारी दीडच्या सुमारास कोमलची आई घरी परत आली असता दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजारच्या गॅलरी मधून एकाला आत उतरवून आतील कडी काढण्यात आली. त्यावेळी हॉल मधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळून आले.घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंत ननावरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहे.