कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:26 IST2019-07-03T18:25:45+5:302019-07-03T18:26:31+5:30
तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून पोल्ट्री शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून पोल्ट्री शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी (दि २) रात्रीच्या सुमारास घडली. दत्तात्रय माणिकराव काकडे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी (दि.३) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी काकडे यांचे शिंदेवाडी येथे पाच हजार पक्षांचे पोल्ट्रीचे शेड आहे. त्यासाठी त्यांनी काही स्थानिक सावकारांकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने या पैशांसाठी काकडे यांच्याकडे तगादा लावला होता. याबाबत काकडे यांनी एका खासगी पतपेढीत कजार्साठी प्रयत्न केला. मात्र, पैशांच्या अडचणीबाबत त्यांनी मित्र परिवार किंवा कुटुंबियांनाही याची माहिती दिली नाही. सावकाराला देण्यासाठी पैशांची जमवाजमव होत नसल्याने काकडे यांनी अखेर मंगळवारी रात्री पोल्ट्री शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत राहूल नारायण काकडे यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून याबाबत सासवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दत्तात्रय काकडे हे त्यांच्या आई वडिलांना एकुलते एक होते. त्यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे पांगारे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.