Young businessman death in the Road accident at Kalyaninagar | कल्याणीनगर येथे रस्ते खोदाईमुळे दुचाकी घसरुन तरुण व्यावसायिकाचा मृत्यू 
कल्याणीनगर येथे रस्ते खोदाईमुळे दुचाकी घसरुन तरुण व्यावसायिकाचा मृत्यू 

पुणे : कल्याणीनगर येथील गोल्ड अ‍ॅडलाब चौकात दुभाजकाला केलेल्या खोदाईमुळे दुचाकी घसरून झालेल्या गंभीर  अपघातात तरूण व्यावसायिकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. सुनिल मल्लेश गाजुल (वय 33 रा. विडी कामगार वसाहत,चंदननगर)यांचा मृत्यू झाला असून अपघातासाठी जबाबदार दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. सोमवार (दि.11) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. सुनिल यांचे लक्ष्मीरोड येथे वर्णरूपी साडी सेंटर हे दुकान आहे.

रात्री दुकानावरून घरी परतत असताना कल्याणीनगर येथे हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात आई,वडील, एक भाऊ व बहिण,पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे चंदननगर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या ठिकाणी दुभाजकाजवळ  खोदाईचे काम सुरू आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या खोदाईच्या ठिकाणी अपघात होऊ नये त्यासाठी  सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.यासाठी जबाबदार दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. याप्रकरणी चालकाने हयगयीने वेगात दुचाकी चालवून दुभाजकाला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात स्वत:च्या मृत्यूस जबाबदार म्हणून चालकावर गुन्हा दाखल  केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल गिरमकर यांनी दिली.

Web Title: Young businessman death in the Road accident at Kalyaninagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.