पुणे : दिवसरात्र काम करून, बंदोबस्तासाठी सात ते आठ तास उभे राहून कोरोनाला हटविण्यासाठी पुणे पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्या कामाचा ताण वाढतो आहे. तुलनेने अपुरे मनुष्यबळ आहे त्यात काम करण्याची सक्ती अशातच नव्याने कामाची जबाबदारी वाढते आहे. परराज्यातील मजुरांची नावे, त्यांचे रेकॉर्ड तयार करताना पोलिसांची दमछाक होत असल्याने त्यांच्या दिमतीला 'यंग ब्रिगेड' धावून आली आहे. या कामाची सुरुवात खडक पोलीस स्टेशनपासून करण्यात आली आहे.
खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 तरुण स्वयंसेवक चार ते पाच तासांच्या वेळेत काम करत आहेत. मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये देखील हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत भोसले मार्गदर्शन करत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांवर असणारा ताण आणि त्यांची संख्या लक्षात घेता या कामांसाठी मदत हवी असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानुसार व्हाट्सग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले. यात अनेकांनी उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवला आहे. मदत करणाऱ्यामध्ये आयटी कर्मचारी, विद्याथी, व्यावसायिक, नोकरदार सर्व स्तरातील व्यक्तीचा समावेश आहे. शहरात एकूण 40 पोलीस स्टेशन असून त्या भागातील कामगार ,मजूर यांची पूर्ण माहिती एकत्र त्याचा 'डेटाबेस' तयार करण्याचे काम सुरू आहे. शहरातील इतर भागांमध्ये देखील खासकरून वारजे, माळवाडी, सिहगड यासारख्या पोलीस स्टेशनमध्ये देखील स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्याची गरज आहे.
* सामाजिक बांधिलकी आणि सहकार्य या भावनेतून कॉम्प्युटरवर माहिती भरण्याचे काम करत आहे. मागील दीड महिन्यापेक्षा अधिक काळ बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी थोडीशी मदत असेल. सध्या सुटी आहे, घरात रिकामा बसून राहण्यापेक्षा आपल्यामुळे कुणाला मदत होणार असल्यास त्यासाठी आवर्जून पुढाकार घ्यायला हवा असे मुंढवा पोलीस स्टेशन येथे काम करणारे सामाजिक बांधिलकी अधिकारी हरेंद्र गोडांबे आणि मॅकेनिकल इंजिनिअर धर्मेंद्र चौहान यांनी सांगितले.