तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड; मनपा आयुक्त मनसे नेत्यावर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 20:17 IST2025-08-06T20:17:30+5:302025-08-06T20:17:56+5:30
माझी बैठक सुरु असताना तुम्ही थेट आत आलात, धमकी दिली, ही पद्धत योग्य आहे का?" असा सवाल आयुक्तांनी केला. यावर किशोर शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं

तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड; मनपा आयुक्त मनसे नेत्यावर संतापले
पुणे - महापालिकेत आज चांगलाच गोंधळ उडाला, जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी थेट आयुक्तांच्या दालनात घुसले आणि त्यानंतर मनसे नेते किशोर शिंदे व मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी आयुक्तांनी थेट, "तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेले गुंड आहात," असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांना धारेवर धरले. या वक्तव्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं.
अधिकच्या माहितीनुसार, आज पुणे महानगरपालिकेत आयुक्त नवल किशोर राम आपल्या दालनात एक बैठक घेत होते. त्याचवेळी मनसेचे नेते किशोर शिंदे काही कार्यकर्त्यांसह थेट त्यांच्या कक्षात प्रवेशले. या अनधिकृत प्रवेशामुळे आयुक्त भडकले आणि त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तातडीने दालनाबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर कार्यकर्ते संतप्त होऊन बाहेरच ठिय्या देऊन बसले. या दरम्यान दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक सुरु झाली.
आयुक्त संतापले
"माझी बैठक सुरु असताना तुम्ही थेट आत आलात, धमकी दिली, ही पद्धत योग्य आहे का?" असा सवाल आयुक्तांनी केला. यावर किशोर शिंदे यांनी प्रतिउत्तर दिलं, "आम्ही काय धमकी दिली? आम्हाला दिलेली धमकी सुद्धा सांगा!" यावर आयुक्त म्हणाले, "तुम्ही दोन मिनिटं थांबू शकत नव्हता का? तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला बदनाम करणारे गुंड आहात." याला प्रत्युत्तर देताना किशोर शिंदे यांनी विचारलं, "आम्ही गुंड कशामुळे आहोत हे तरी सांगा..."
महापालिकेत तणावाचं वातावरण
या संपूर्ण वादानंतर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह आयुक्त दालनाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेचं मुख्य गेट काही काळ बंद करण्यात आलं. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी, राजकीय पक्ष व महापालिका प्रशासन यांच्यातील हा संघर्ष अधिक उग्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.