यंदाही घाण पाणी शिरणार घरांमध्ये

By Admin | Updated: May 26, 2014 05:32 IST2014-05-26T05:32:23+5:302014-05-26T05:32:23+5:30

शहरातील शिवाजी पुतळा चौपाटी येथील गटारांची कामे पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला, तरी अद्याप सुरू झालेली नाहीत.

This year the water will get dirty water | यंदाही घाण पाणी शिरणार घरांमध्ये

यंदाही घाण पाणी शिरणार घरांमध्ये

भोर : शहरातील शिवाजी पुतळा चौपाटी येथील गटारांची कामे पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला, तरी अद्याप सुरू झालेली नाहीत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय. शिवाय, हे अपूर्ण काम पूर्ण झाले नाही, तर दर वर्षीप्रमाणे या वेळीही गटारांचे घाण पाणी श्रीपतनगरमधील नागरिकांच्या घरामध्ये शिरणार आहे. त्यामुळे सदरचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. शहरातील महाड-पंढरपूर रोडवरील वाहतुकीला वारंवार होणारा अडथळा यांमुळे रामबाग ते महाड नाक्या दरम्यानची घरांची, दुकाने, हॉटेलची अतिक्रमणे काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आला. त्यानंतर पूरहाणी अंतर्गत शहरातील गटारे व डांबरीकरण व वाघजाई घाटातील डांबरीकरण करण्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चौपाटी परिसरातील गटारे उकरून काम सुरू झाले. मात्र, त्या कामाला वकिलामार्फत नोटीस दिल्यावर मागील २ महिने काम अपूर्ण आहे. मातीचे ढीग, वाळू, खडी रोडवर पडली आहे. यामुळे पुन्हा रस्ता अरुंद होत असून, वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. गटाराचे काम पावसाळ्यापूर्वी झाले नाही, तर पोलीस स्टेशन व महाड-पंढरपूर रोडवरील पाणी, सांडपाणी, घाण श्रीपतीनगरमधील घरात पावसाळ्यात जाणार आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचा झालेल्या बदलीमुळे कामांना गती येणार किंवा नाही, याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे.

Web Title: This year the water will get dirty water