यवत : यवतमध्ये शुक्रवारी (दि. १) सकाळी एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी त्या तरुणाला काही वेळातच ताब्यात काही वेळातच संतप्त झालेल्या जमावाने वाहनांची तोडफोड जाळपोळ करत संबंधित तरुणाच्या घरावर हल्ला चढवला. दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
काही झोपड्या पाडण्यात आल्या, तसेच काही घरांवर दगडफेक झाली. अनेक वाहनांचेही नुकसान झाले, तर एका दुचाकीला आग लावण्यात आली. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही जमाव नियंत्रणाबाहेर गेला. यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी शांततेचे आवाहन केले; मात्र, जमाव अधिक आक्रमक झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलीस, एनडीआरएफ पथक यांनी तातडीने पाऊल उचलत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. गावाच्या मुख्य चौकात पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत घरी परतण्याचे आदेश दिले.
आता यवतमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे या ताब्यात घेतलेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे
जमावबंदी लागू
यवतमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे १ ऑगस्ट ते ३ ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.