यमराजने मला सांगितले होते त्याला मारायला; ‘त्या’ अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा
By नितीश गोवंडे | Updated: January 26, 2025 09:59 IST2025-01-26T09:59:27+5:302025-01-26T09:59:55+5:30
वरून मला आदेश आला होता, स्वतः यमराजाने सांगितले होते की

यमराजने मला सांगितले होते त्याला मारायला; ‘त्या’ अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा छडा
पुणे : कॅम्प परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळून आला होता. डोक्यात गंभीर जखम असल्यामुळे खुनाचा प्रकार असल्याचे समजून बंडगार्डन पोलिस तपास करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली असून, त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस चौकशीदरम्यान, त्या व्यक्तीने सांगितले की, “वरून मला आदेश आला होता, स्वतः यमराजाने सांगितले होते की, त्या व्यक्तीची वेळ आली आहे, त्याला मारून टाक.” आरोपीच्या बोलण्यावरून तो पोलिसांना मनोरुग्ण वाटला. डॉक्टरांसमोर त्याला हजर केले असता डॉक्टरांनीदेखील तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले. त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरातील नेहरू मेमोरियल हॉलसमोरील फुटपाथवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता. त्याच्या अंगावर, डोक्यात जखमा होत्या. याबाबत नागरिकाने पोलिसांना माहिती दिली होती. ६० वर्षीय व्यक्तीच्या खूनप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. कॅमेऱ्यात तो एका अनोळखी व्यक्तीला मारहाण करीत असताना दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.