नीराजवळ जेऊर रेल्वे गेटवर कामगार महिलेला भरधाव संपर्क एक्स्प्रेसने उडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 20:38 IST2021-01-07T20:37:38+5:302021-01-07T20:38:34+5:30
काम सुरु असलेल्या ठिकाणी दुपारी १:२० च्या दरम्यान साप निघाल्याचा आरडाओरडा झाला...

नीराजवळ जेऊर रेल्वे गेटवर कामगार महिलेला भरधाव संपर्क एक्स्प्रेसने उडवले
नीरा : पुणे - मिरज रेल्वे लोहमार्गाचे द्रुतगतीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम सुरु असताना कामगार महिलेला नीरा - वाल्हे दरम्यान भरधाव रेल्वेने जोरदार धडक दिली. या धडकेत कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. उमा मायाराम बारकाईने (वय ४०) असे मयत महिलेचे नाव आहे.
नीरा पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे पती मायाराम तुकाराम बारे (वय ४५, सध्या रा. तांबवे, मुळ रहिवासी. मध्यप्रदेश) यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
नीरा - वाल्हे दरम्यान रेल्वे मार्गावरील जेऊर गेट नं. २८ च्या जवळ भरधाव गाडी नं. ०२६३० संपर्क एक्स्प्रेसने रेल्वे रुळाचे काम करणाऱ्या महिलेला उडवले. सध्या रेल्वे मार्गाच्या द्रुतगतीकरणाचे व नव्या कँबिनचे काम सुरु आहे. हे काम जेऊर रेल्वे गेटच्या आसपास कंत्राटी कामगार महिला व पुरुष करत होते. दुपारी १:२० च्या दरम्यान काम सुरु असलेल्या ठिकाणी साप निघाल्याचा आरडाओरडा झाला. सापाच्या भीतीने महिला रेल्वे रुळावर गेली व त्याचवेळी वाल्हे येथून नीरेच्या दिशेने वेगात संपर्क एक्सप्रेस चालली होती. या एक्सप्रेसची जोरदार धडक या महिलेला बसली व ती जागीच ठार झाली.